मुंबई: अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना अटकही झाली आहे. दरम्यान अंबानी स्फोटकं प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. या टीकेवरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांना टोला लगावला आहे.
अंबानी स्फोटकं आणि हिरेन मृत्यू प्रकरणावर बोलताना राऊत यांनी राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली होती. राऊत यांच्या टीकेनंतर भाजपाचे मुक्त प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत निशाणा साधला.
‘हे’ एकच वाक्य सर्वाधिक वेळा बोलण्याचा विक्रम संजय राऊतांच्या नावे’ https://t.co/afJzTpQs2j
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 14, 2021
“संजय राऊत यांच्या नावे एकच वाक्य सर्वाधिक वेळा बोलायचा विश्वविक्रम नोंदवला जाईल अंस दिसतंय आणि ते वाक्य असेल ‘हा सरकार अस्थिर करायचा प्रयत्न आहे,’ असा टोला केशव उपाध्ये यांनी राऊतांना लगावला आहे.
राऊत एनआयए तपासावर काय म्हणाले होते?
“सचिन वाझे हे अत्यंत प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकार आहे, यावर माझा विश्वास आहे. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटीन कांड्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एका संशयास्पद मृत्यू प्रकरणातही. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे. त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांची गरज नाही. आम्ही एनआयएचा आदर करतो. पण, आपल्या पोलिसांनी सुद्धा याचा तपास केला असता.
मुंबई पोलीस आणि एटीएस यांचाही आदर केला जातो, पण केंद्रीय तपास यंत्रणा वारंवार हस्तक्षेप करून मुंबई आणि मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करत आहे. यंत्रणा राज्यात अस्थिरता निर्माण करत असून, मुंबई पोलीस आणि प्रशासनावर दबाब निर्माण करत आहे,” असं राऊत यांनी म्हटलेलं आहे.