मुंबई– काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात देशाचे नेतृत्त्व करण्याची पूर्ण क्षमता आहे तसेच ते ताकदीचे नेते म्हणून समोर येतील, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी ज्या प्रमाणे आक्रमक प्रचार करत आहेत ते पाहता शिवसेनेने त्यांचे कौतुक केल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधींना पप्पू म्हणणं चुकीचे आहे, असे स्पष्ट करतानाच देशातील जनता सर्वात मोठी ताकद असून, ती कोणालाही पप्पू बनवू शकते, असा अप्रत्यक्ष टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाणला.
एका हिंदी वाहिनीच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी विचार मांडले. यावेळी त्यांनी मित्रपक्ष भाजपवर हल्लाबोल केला तर काँग्रेस व राहुल गांधींची स्तुती केली. खासदार संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत ते पाहता त्यांच्यात दम असल्याचे दिसून येते. एका राष्ट्रीय पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे. काही लोकांनी त्यांच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित केली. त्यांना पप्पू वगैरे म्हणून हिणवले गेले. मात्र, असे एखाद्याला हिणवणे योग्य नाही. या देशाची जनता कोणालाही हिरो बनवू शकते आणि कोणालाही पप्पू बनवू शकते असे सांगत खासदार राऊतांनी भाजपला टोला हाणला.
देशात आता नरेंद्र मोदींची लाट ओसरलेली आहे. लोक आता त्यांना विकासाबाबत विचारणा करत आहेत. हे सर्व गुजरातमधील वातावरणावरून दिसून येत आहे. मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीसारख्या निर्णयामुळे देशातील जनता नाराज आहे. त्यामुळे मोदींचा हवा आता संपल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाही-
भाजप आणि राष्ट्रवादीतील जवळिकीबाबत संजय राऊत यांना छेडले असता राऊत म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येतील असे मला अजिबात वाटत नाही. शरद पवार भाजपसोबत तडजोड करतील असे मला वाटत नाही. पवारांच्या विचारधारेत भाजप बसत नाही, त्यामुळे देशपातळीवर ते एकत्र येऊच शकत नाहीत. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीत जसे निकाल लागतात त्यानुसार राजकीय परिस्थितीत निर्णय घेतले जातात. त्यामुळे राज्यात काहीही होऊ शकते असे राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडून भावी राजकारणाचे स्पष्ट संकेत-
खासदार संजय राऊत यांनी प्रथमच जाहीररित्या राहुल गांधींचे कौतूक केले आहे. याद्वारे शिवसेनेचे आगामी काळात राजकारण नेमके काय असेल हे स्पष्ट होत आहे. संजय राऊत जे बोलतात त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मूकसंमती असते, असे मानले जाते. भाजपकडून जी शिवसेनेला वागणूक दिली जाते त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपवर कमालीचे नाराज आहेत. सध्या शिवसेना केंद्रासह राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे थेट टीका करण्याचे टाळतात अशीही चर्चाही आहे. त्यामुळे आपण थेट टीका न करता दुस-या फळीतील नेत्यांकडून भाजप नेतृत्त्वावर हल्लाबोल करण्याची रणनिती शिवसेनेने अवलंबिल्याचे बोलले जाते.