महत्वाचे…
१. सातारा खून प्रकरण २. निलंबित पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीतून बाहेर येणारी सर्व माहिती दररोज गृह विभागाकडे होत आहे सादर ३. सांगली पोलिसांच्या कृत्याने संताप
कोल्हापूर – संवेदनशील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदावर निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमला नाही, एका उपनिरीक्षकावर जबाबदारी दिली. अशा प्रकारचा हलगर्जीपणा आणि कामात कुचराई केल्यामुळेच खुना सारखी गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि शहर उपअधीक्षक दिपाली काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकारांना दिली.
सांगली शहर पोलीस ठाण्यातील अनिकेत कोथळे खून प्रकरणाने राज्यभरात पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सह पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्याकडे आहे. मात्र घरगुती कारणास्तव त्यांनी १५ दिवस रजा घेतली होती. या काळात संवेदनशील आणि मोठे पोलीस ठाणे असणाऱ्या या पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार अनुभवी पोलीस निरीक्षकाकडे देणे गरजेचे होते. मात्र पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि शहर उपअधीक्षक दिपाली काळे यांनी उपनिरीक्षक समीर चव्हाण यांच्याकडे पदभार दिला होता. अशी माहिती त्यांनी दिली.
या कालावधीतच उपनिरीक्षक युवराज कामटे आणि इतर पाच पोलिसांनी संशयित अनिकेत कोथळे याला ताब्यात घेऊन कोठडीत थर्ड डिग्रीचा वापर केला. यामध्ये कोथळेचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळेच कामटे आणि इतर पोलिसांनी अशा प्रकारचे घृणास्पद आणि लाजिरवाणे काम केले. संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजत आहे. गुन्हेगारी विश्वात असा प्रकार राज्यात आजपर्यंत कुठेही झालेला नाही.
पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपाधीक्षक दीपाली काळे यांच्या हलगर्जीपणामुळे आणि कामातील कुचराईमुळे असा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यांना आठ दिवसांची मुदत दिली असून त्यांच्याकडून नोटिसीला उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेतला जाणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कोथळे खून प्रकरणात अटक केलेले पोलीस आणि निलंबित पोलीस यांची खातेनिहा य चौकशी केली जाणार आहे. सीआयडी खुनाचा तपास करीत आहे. मात्र पोलिसांनी इतर बाबींचा तपास सुरू केला असून या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान अनिकेत कोथळेच्या खुनासंबंधाचा तपास आणि निलंबित पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीतून बाहेर येणारी सर्व माहिती दररोज गृह विभागाला पाठवली जात असून वरिष्ठांच्या आदेशानुसार हा डे टु डे तपासाचा लेखी रिपोर्ट पाठवला जात आहे.