राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध बुधवारी सकाळी ईडीने केलेली कारवाई कोल्हापूर मधील मुश्रीफ समर्थकांना आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांना पचनी पडली नाही, असे चित्र दिसत आहे. मुश्रीफ यांच्या समर्थकांनी कोल्हापूरमध्ये रस्त्यावर उतरत भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा धारण करत घोषणाबाजी केली आणि आपला रोष व्यक्त केला.
तत्पूर्वी,भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी आधीच हसन मुश्रीफ हे तुरुंगात जातील अशी भविष्यवाणी केली होती आणि त्यानंतर लगेचच मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी पडली.
यावर राष्ट्रवादीचे नेते भाजपवर आरोप करत हि त्यांची आणि केंद्रीय तपास यंत्रणांची मिलीभगत असल्याचे म्हणत आहेत. तर, भाजप नेते मात्र तपास यंत्रणांमध्ये कोणताही हस्तक्षेप नसल्याचे सांगत हि कारवाई योग्यच असल्याचे सांगत आहेत.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते रविकांत वरपे म्हणाले, “सूडाच्या राजकारणाचा हा अजून एक प्रयत्न आहे. कुठलेही सबळ पुरावे नसताना तपास यंत्रणा ज्याप्रकारे कारवाई करत आहे त्यावर याआधी न्यायालयानेसुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती हि सर्वसमावेशक होती. पण, भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण गढुळ झाले आहे.”
राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले, “केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून याआधीसुद्धा अनेक कारवाया झाल्या पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. कुणाच्या म्हणण्यानुसार तपास यंत्रणा कारवाई करत असेल तर लोकशाहीला हे घातक आहे.”
शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, “राजकीय आकसापोटी आणि नीच वृत्तीच्या राजकारणापोटी हि कारवाई करण्यात आली आहे. भाजप सत्तेत आल्यापासून तपास यंत्रणांच्या कारवाया या केवळ विरोधी पक्षावरच होत आल्या आहेत. विरोधी पक्ष यावर आंदोलनात्मक भूमिका घेणार आहेच पण लोकांचा असंतोष देखील वाढत चालला आहे, हे सरकारने लक्षात ठेवावे.”
बुधवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२१ मध्ये माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कुटुंबातील सदस्य आणि कंपन्यांच्या माध्यमातून ‘बेनामी’ संस्था मार्फत भ्रष्ट व्यवहारात गुंतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने केलेल्या कारवाईवर विरोधी पक्षाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
यावर भाजप नेते भालचंद्र शिरसाठ म्हणाले, “हसन मुश्रीफ यांच्यावर अनेक वर्षांपासून अफ़रातफरीची प्रकरणे चालू आहेत आणि त्याच्या चौकशीअंती त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली आहे. हि एका दिवसात झालेली कारवाई नसून ह्यात सरकारचा काहीही संबंध नाही विरोधी पक्षात अनेक भानगडी करणारे लोक असल्यामुळे त्यांना अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.”
हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष देखील आहेत. याआधी त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून पद भूषविले होते.
याआधी, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या काही बड्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे लोकसभा खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हे आहेत. यातील अनिल देशमुख आणि संजय राऊत यांची न्यायालयाद्वारे जामिनावर सुटका झाली असून नवाब मलिक यांचे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.
Web Title: Opposition became aggressive after ED raids on Mushrif’s residences