मुंबई: सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर काल(बुधवार) बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे.
सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. तर, सचिन वाझे प्रकरणाचा तपास एनआयए व एटीएस करत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
NIA & ATS are investigating Sachin Waze case very professionally. Action will be taken accordingly. Param Bir Singh has been transferred from the post of Mumbai Police Commissioner so that investigation can be done without any obstruction: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/bjo8uC7aNb
— ANI (@ANI) March 18, 2021
“एनआयए आणि एटीएस सचिन वाझे प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे करत आहेत, त्यानुसार कारवाई केली जाईल. परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही अडथळ्याशिवाय तपास होईल.” असं अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सचिन वाझे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बुधवारी शोधाशोध केली असून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत पथकाच्या हाती काय लागले याबाबत एनआयएने माहिती दिली नाही. वाझे वापरात असलेल्या मर्सिडीज गाडीतून हस्तगत करण्यात आलेली पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र, कपडे आणि ज्वलनशील द्रव्याच्या बाटल्यांबाबत एनआयएने वाझे यांच्याकडे चौकशी केल्याचे समोर आले आहे.