Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंना राष्ट्रवादीची 'टाळी', नव्या समीकरणाचे वारे!

राज ठाकरेंना राष्ट्रवादीची ‘टाळी’, नव्या समीकरणाचे वारे!

मुंबई: राज्यातील दुकानांवरील पाट्या मराठीतच असाव्यात, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागणीला सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. राज यांनी आपल्या सभांमधून अनेकदा दुकानांवर अन्य भाषांमध्ये लावण्यात येणाऱ्या पाट्यांवर आक्षेप घेतला होता. अनेक दुकानांच्या पाट्यांवरील बहुतांश मजकूर हा अन्य भाषेत असेल तर ही खरंच चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही राज यांच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

या पाट्या मराठीतच असाव्यात यासाठी मनसेकडून अनेकदा आंदोलनंही करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाने मनसेच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला नव्हता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पहिल्यांदाच जाहीरपणे मनसेच्या भूमिकेचे समर्थन केले.आव्हाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली होती. त्यानंतर रविवारी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. त्यामुळे ही राज्यातील भाजपाविरोधी आघाडीची नांदी असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यामध्ये आज जितेंद्र आव्हाड यांनी थेट मनसेच्या भूमिकेला समर्थन दिल्याने राज्यात लवकरच नवी राजकीय समीकरणे अस्तित्त्वात येण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी राज ठाकरे यांच्या कालच्या सभेनंतर वसईतील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. काल रात्री उशीरा वसईतील पाच ते सहा दुकानांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. दुकानांच्या पाट्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी काट्यांनी आणि लोखंडी रॉडने तोडून काढली. ही दुकाने गुजराती लोकांची असल्याचे वृत्त आहे. दुकानासोबतच गुजराती गाड्यांचीही तोडफोड केली आहे. वसई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील घोडबंदर ते तलासरी दरम्यानच्या बहुतांश धाबे, दुकाने, हॉटेलांवर आता गुजराती पाट्या झळकू लागल्या आहेत. या पाट्यांवरून मराठीला तडीपार केल्याचे दिसत असतांना आता वसई तालुक्यातही गुजराती फलक झळकू लागले आहेत. इतकेच नाही तर वसई तालुका महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये असल्याचे उघडपणे लिहिण्याचे धाडस गुजराती समाजाकडून केले जात होते. याचा मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सभेनंतर खरपूस समाचार घेत तोडफोड केली आहे. वसईसह पालघर जिल्हयाचा गुजरातमध्ये समावेश करण्याचा कट शिजला जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. याप्रकरणी खळळ खट्याक करण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा गेल्या आठवड्यात दिला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments