मुंबई: राज्यावर पुन्हा कोरोनाचं संकट पुन्हा गडद होताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख महानगरांसह काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा उद्रेक झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं असून, आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहे. पुण्यासह अनेक शहरांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. रात्री ७ वाजता मुख्यमंत्री काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे कान लागले आहेत.
राज्यात कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असून, राज्य सरकारने जिल्हा पातळीवरील यंत्रणांना तातडीने निर्णय घेऊन पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे, औरंगाबादबरोबर विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्येही करोनानं डोकं वर काढलं आहे. इतर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून, राज्य सरकारकडून नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचं व खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातं आहे.
नागरिकांकडून सूचनांचं पालन होत नसल्याचंही दिसत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्य सरकारकडून काही निर्बंध आणले जाण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे आज काही महत्त्वाची घोषणा करणार का? याकडेही सगळ्याचं लक्ष असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी पुन्हा लॉकडाउन केला जाऊ शकतो, असा इशारा आधीच दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार हे आजच्या जनसंवादातून स्पष्ट होणार आहे.
पुण्यात रात्रीची संचारबंदी, नागपूर, यवतमाळ, अमरावतीतही नाईट कर्फ्यूची शक्यता
उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक सुरू राहणार आहे. दुसरीकडे विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही करोनाचा उद्रेक झाला असून, राज्य सरकार या तीन जिल्ह्यांत नाईट कर्फ्य लागू करण्याचा विचार करत आहे.