Placeholder canvas
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईकरांना पावसानं झोडपलं!

मुंबईकरांना पावसानं झोडपलं!

Rainमुंबई : आज अचानक पावसाने पुन्हा मुंबईत हजेरी लावली. दादर, परळपासून पुढे कुलाब्यापर्यंत अचानक आभाळ भरून आलं आणि पावसाला सुरुवात झाली. दक्षिण मुंबई व पश्चिम उपगरांमध्ये नागरिकांना शुक्रवारी पावसानं झो़डपलं.

पावसाची शक्यता स्कायमेटनं वर्तवली होती. सीएसटी, चर्चगेट, मरीन लाइन्स, जुहू परिसरात पावसाने हजेरी लावली. यंदा परतीचा पाऊस विलंबाने गेला. मात्र त्यानंतरही पाऊस राज्यात विविध ठिकाणी अधूनमधून हजेरी लावतच आहे. राज्यात नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकणात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी ऐन दिवाळीतही पावसाने थांबायचे नाव घेतले नाही. तत्पूर्वी काही दिवस म्हणजे २१ ऑक्टोबरला पावसाने रात्री अचानक जोरदार बरसून मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. त्यानंतर दिवाळीदरम्यान अरबी समुद्रातील ‘क्यार’ चक्रीवादळाने थैमान घातले आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवरही मुंबईत पावसाने हजेरी लावली होती.

दक्षिणेकडून उत्तरेकडे हे वादळ सरकत असून परिणामी येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह लगतच्या परीसरामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, डहाणू या भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऐन दिवाळीतही पावसानं पाठ सोडली नसल्यामुळे नागरिकांमध्ये निरुत्साहाचे वातावरण असून पावसापासून अजूनही सुटका झाली नसल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास दक्षिण मुंबईमध्ये नागरिकांना पावसानं अवचित गाठलं. तर बांद्र्यामध्ये जोरदार पावसाची सर कोसळल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली.

‘महा’ हे वादळ 40 ते 60 किलोमीटरच्या गतीनं उत्तरेकडे सरकत असून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आठ ते 12 फूट उंचीच्या लाटांची शक्यता आहे. गोवा कर्नाटक लगत समुद्रामध्ये ‘महा’ वादळामुळे पावसाचे वातावरण असून कोकणामध्ये मुसळधार त्यामुळे समुद्रतीरावरील नागरिकांनी सावध रहावं अशी सूचना स्कायमेटनं दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments