Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रछगन भुजबळ यांना केईएम रूग्णालयातून डिस्चार्ज

छगन भुजबळ यांना केईएम रूग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: प्रकृती अस्वास्थामुळे केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि काळा पैसा प्रतिबंधक कायद्याखाली दोन वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर नुकताच त्यांना जामीन मंजूर झाला होता. जामीन मिळाल्यानंतरही त्यांच्यावर मुंबईतील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. रूग्णालयातून ते थेट त्यांच्या सांताक्रूज येथील घरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भुजबळ यांच्यावर स्वादुपिंडावरील आजारावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. तसेच भुजबळ कुटुंबीयांनी लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा अशी विनंतीही रूग्णालय प्रशासनाला केली होती. त्यामुळे भुजबळ यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. छगन भुजबळ यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने साधारण महिनाभरापूर्वी जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी उदरविकारासंबंधीचे डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना केईएम रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांच्या स्वादुपिंडाला संसर्ग झाल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरू होते.

दरम्यान, येत्या १० जूनला पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या समारोपाला छगन भुजबळ हे पुन्हा राजकारणात सक्रीय होतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दलित आणि इतर मागासवर्गीयांची एकजूट दाखवून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जवळपास १५ मिनिटे दोघांनी चर्चा केली. यावेळी मिलिंद नार्वेकरदेखील उपस्थित होते. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी नेमके काय कारण असावे याचा अंदाज बांधला जात आहे.

भुजबळ म्हणाले आजार बरां झालेला नाही….

छगन भुजबळ यांनी निवासस्थानी पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘आजार पूर्णपणे बरा झालेला नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे सक्रीय राहणार नाही या अटीवर मला डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. चेकअप करत त्यांच्या देखरेखेखाली राहायचं आहे. एक दोन शस्त्रक्रिया कराव्या लागणार असून त्यासाठी पुन्हा एकदा रुग्णालयात भर्ती व्हावं लागेल. जे काही असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करु’. यावेळी भुजबळांना इतर कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्यास नकार दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments