Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईरिक्षा चालक – मालकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक कल्याणकारी मंडळासाठी आठवडाभरात समिती -...

रिक्षा चालक – मालकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक कल्याणकारी मंडळासाठी आठवडाभरात समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रिक्षा चालक – मालकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे कल्याणकारी मंडळ लवकरच स्थापन केले जाईल. यासाठी शासन आणि संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती येत्या सात दिवसात गठीत करुन त्यामार्फत कल्याणकारी मंडळाचे कामकाज तसेच रिक्षा चालक – मालकांसाठी राबवावयाच्या विविध योजनांची आखणी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे रिक्षा चालक – मालकांच्या विविध संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत जाहीर केले.
राज्यातील विविध रिक्षा चालक – मालक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रिक्षा चालक – मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्यासह राज्यातील विविध रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी आजपासून राज्यभरात रिक्षाच्या संपाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या संघटनांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते. मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतर काल रात्री उशीरा संघटनांनी आपला संप मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, रिक्षा चालक-मालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी भरीव निधी मिळेल याची तरतूद केली जाईल. मंडळामार्फत रिक्षा चालक-मालक यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जातील. या योजना कोणत्या असाव्यात तसेच कल्याणकारी मंडळाचे स्वरुप काय असावे हे ठरविण्यासाठी येत्या सात दिवसात शासनाचे काही प्रतिनिधी आणि संघटनांचे प्रतिनिधी यांची समिती गठीत केली जाईल. समितीच्या शिफारसीनंतर लागलीच कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्यामार्फत रिक्षा चालक-मालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवू, असे त्यांनी सांगितले.
रिक्षा चालक-मालकांच्या इतर विविध मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असून त्याबाबतही लवकर निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments