Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईत कोविड लसीचा पहिला साठा झाला दाखल

मुंबईत कोविड लसीचा पहिला साठा झाला दाखल

मुंबई: कोरोनावरील बहुप्रतिक्षित लसीचा पहिला साठा आज मुंबईत पोहोचला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने येथील कोव्हिशील्ड लसीचे १ लाख ३९ हजार ५०० डोस आज पहाटे साडेपाच वाजता मुंबईत आणले गेले. हा साठा पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात सुरक्षितपणे ठेवण्यात आला आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्तात लसीचा हा साठा मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पुण्याहून आणला. देभभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होत आहे. त्यासाठीच्या पहिल्या टप्प्यातील साठा दाखल होत असला तरी पालिकेच्या कांजुरमार्ग येथील मार्केट इमारतीत लशींसाठी कोल्ड स्टोरेज काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

त्यामुळं लस साठवणूक करण्याची व्यवस्था पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात करण्यात आली आहे. कांजुरमार्ग येथील कोल्डस्टोरेजची क्षमता एकाच वेळी सुमारे एक कोटी लशींच्या साठवणुकीची आहे. तर एफ दक्षिण विभाग कार्यालयातील लस क्षमता १० लाख इतकी आहे.

दोन लाख जणांना लस

मुंबईत सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर संबंधित कर्मचारी अशा २ लाख व्यक्तींची नावे कोविन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख जणांना लस दिली जाईल.

मुंबईत केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयांत लसीकरण प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे, बीकेसीतील केंद्रासह पालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रे, दवाखाने, आरोग्य केंद्रामध्येही लसीकरण होणार आहे. त्या जोडीला पुढील कालावधीत शाळा आणि परिसरातील सभागृहांचाही त्यासाठी उपयोग केला जाईल.

२७५ मुख्य प्रशिक्षकांनी २,५०० कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण 

लसीकरण यशस्वी व्हावे यासाठी पालिकेने २७५ मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्या मदतीने २,५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. लसीकरण वेगवान आणि सुरक्षित होण्यासाठी आणखी १० हजार कर्मचाऱ्यांची निवड झाली असून त्यातील ५ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments