मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत आहे. महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात असून निर्बंधही आणले जात आहेत. दोन दिवस मुंबईतील रुग्णसंख्येत घसरण नोंदवण्यात आली होती. मात्र, बुधवारी तब्बल १,१६७ मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याची नोंद होताच यंत्रणांचे धाबे दणाणले. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून मुंबईतील प्रसिद्धट मैदानांपैकी एक मैदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेटमध्ये असणाऱ्या ओव्हल मैदानात क्रिकेट. फूटबॉल खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
मुंबई महापालिकेने मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक असणारं ओव्हल मैदाना शुक्रवार म्हणजेच २६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेशापर्यंत या मैदानावर कोणत्याही प्रकारचा खेळ किंवा इतर गोष्टींसाठी परवानगी दिली जाणार नाही. गुरुवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून हे मैदान बंद करण्यात येणार आहे.
“करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पूर्वकाळजी म्हणून आम्ही मैदान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती महापालिकेच्या ए वॉर्डमधील सहाय्यक नगरपालिका आयुक्त चंदा जाधव यांनी दिली आहे.
चर्चगेटमध्ये असणाऱ्या ओव्हल मैदानात क्रिकेट. फूटबॉल खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अगदी ठाणे, कल्याण, अंबरनाथ, विरारपासून तरुण या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. याशिवाय जॉगिंग तसंच मॉर्निग वॉकसाठीही गर्दी होत असते.
चंदा जाधव यांनी गेल्या आठवड्यात मैदानावर जाऊन पाहणी केली असता करोना रुग्ण वाढत असतानाही तेथील गर्दी कमी होत नसल्याचं निदर्शनास आलं होतं. दरम्यान मुंबई पालिकेने ज्या ठिकाणी गर्दी होत आहे अशा सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध आणण्यासंबंधी वॉर्ड स्तरावर निर्णय घेण्यास सांगितलं आहे.