मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेसची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वार्डनिहाय चर्चा करून प्रत्येक वार्डात संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेस नेत्यांची बैठक प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, विधिमंडळ काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आ. अमिन पटेल, चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड, संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशीष दुवा, सोनल पटेल आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात चर्चा झाली असून मतदार पुनर्रचना करताना त्यात अनेक त्रुटी झाल्या आहेत. एससी, एसटी, महिलांना यात योग्य ते प्रतिनिधीत्व दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यासंदर्भात जेष्ठ नेते जनार्दन चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल मुख्यमंत्री व निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. मुंबई शहराच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून हे शहर आणखी चांगलं कसं होईल यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.