Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रतीनही रेल्वेमार्गांवर ‘मेगाब्लॉकने प्रवाशांचे मेगाहाल

तीनही रेल्वेमार्गांवर ‘मेगाब्लॉकने प्रवाशांचे मेगाहाल

मुंबई – रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. आज सकाळी ११.३० वाजल्यापासून दुपारी ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील बोईसर-वाणगाव रेल्वेस्थानकांदरम्यान पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज गुजरातकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल होत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते नायगाव या रेल्वेस्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन स्लो अशा दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने, विरार-वसई ते बोरीवली-गोरेगाव दरम्यानची अप आणि डाऊन स्लोवरील वाहतूक फास्ट मार्गावरुन चालवली जाणार आहे. तसेच, या मार्गावरील काही लोकल रद्दही करण्यात येतील.
मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप फास्ट रेल्वेमार्गावर घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे यादरम्यानच्या लोकल अप स्लो मार्गावरुन धावतील. ठाणे आणि सीएसएमटीपर्यंतच्या सर्व लोकल दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या रेल्वेस्थानकात थांबतील. शिवाय ब्लॉकच्या काळात या मार्गावरील सर्व डाऊन फास्ट लोकल किमान १५ मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे मार्गावर नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान दुरुस्तीच्या कामांसाठी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत हार्बर रेल्वेमार्गावरील अप आणि डाऊन गाड्या नेरुळ ते पनवेलदरम्यान बंद राहतील. याचबरोबर ट्रान्सहार्बरवरील लोकलही पनवेल ते नेरुळदरम्यान आणि पनवेल-अंधेरी लोकलही या वेळेत बंद असतील. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसएमटी ते नेरुळ आणि वाशी या रेल्वे स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

बोईसर-वाणगाव स्थानकांदरम्यान पॉवर ब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील बोईसर-वाणगाव रेल्वेस्थानकांदरम्यान आज दुरुस्तीच्या कामासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे चर्चगेट, वांद्रे, बोरिवली आण‌ि विरार येथून डहाणू तसेच गुजरातकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या जाणर आहेत. त्यामध्ये वांद्रे येथून सकाळी ९.१५ वाजताची वापी पॅसेंजर, विरारहून सकाळी ११.२५ ला सुटणारी वलसाड-शटल, विरारहून सकाळी ११.५८ वाजता सुटणारी विरार-डहाणू रोड लोकल या डाऊन गाड्या तसेच डहाणूहुन सकाळी १०.५ वाजता सुटणारी डहाणू-विरार लोकल, वापीहून १.५५ ला सुटणारी वापी-विरार शटल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments