Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीचा फटका!

मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीचा फटका!

मुंबई: मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतक-यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जालन्यातील वंजार उमरद गावातील येथील ७० वर्षीय नामदेव शिंदे यांचा गारा अंगावर पडून मृत्यू झाला. तर वाशिममध्ये महागाव येथे यमुना हुंबाड या महिलेचा दुर्दैवी अंत झाला असून, आणखी एक महिला जखमी आहे. जालना शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात आज सकाळी आठ वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. अवकाळी वादळी पाऊस,गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातील आलेल्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. अस्मानी संकटामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ पडलेल्या टपोऱ्या गारांमुळे रस्त्यावर, शेतात गारांचा पांढरा खच साचला होता. गारांमुळे जालना तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा पिकांसह जाफराबाद तालुक्यात शेडनेट हाऊसचे नुकसान झाले आहे. अर्ध्या तासांनंतर आकाश पांढरेशुभ्र होऊन ऊन पडले. वातावरणामध्ये सध्या कमालीचा गारवा आहे. तर अमरावतीतल्या अंजनगाव सुर्जी येथे रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर गारांसह जोरदार पाऊस बरसला. साधारण संत्र्याच्या आकाराएवढी मोठी गार येथे पाहावयास मिळाली. जवळपास दहा मिनिटे हा गारांचा जोरदार वर्षाव येथे सुरू होता. तालुक्यातील विहीगाव, चिंचोली, सातेगाव, मूर्खादेवी, कापूसतळणी, गावंडगाव, टाकरखेडासह अन्य गावांमध्येही हा गारांचा वर्षाव झाला. यामुळे संत्रा, हरभरा, कापूस व गव्हाच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातही गेल्या दोन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. वाशिमलाही आज गरपिटीचा फटका बसला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले. वाकद परिसरात वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मालेगाव व वाशिम तालुक्‍यात वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, सेलू, बोरी येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे; तर जिंतूर तालुक्यातील वझुर येथे वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments