मुंबई: सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. अंतिम सुनावणीनंतर निर्णय होणार असून, या प्रश्नावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुनावणीतील युक्तीवादाचा हवाला देत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
मराठा आरक्षण याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. सुनावणीतील युक्तीवादाचा हवाला देत चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलं आहे. “देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. या मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा दिला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे,” असं म्हणत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. या मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात भक्कम पाठिंबा दिला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे.@Dev_Fadnavis https://t.co/TzdkcjDjiu
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 24, 2021
“राज्य सरकारला असा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा कायदा संवैधानिक आहे. हाही भक्कम युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. कर्तव्यशून्य, अपयशी आणि कोणत्याच गोष्टीकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.
“थोडी जरी लाज या सरकारच्या मनात शिल्लक असेल, तर आता तरी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा स्वत:चे कर्तृत्त्व दाखवा. भलेही फसवणुकीने तुम्ही सत्तेत आले असाल! आता आलाच आहात, तर थोडे तरी स्वकर्तृत्त्व दाखवा,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.