धुळे: शहरातील देवपूर भागात नकाणे रोडवर असलेल्या मैत्रेय सुवर्णसिद्धी प्र्रा.लि. कंपनीच्या कार्यालयास बुधवारी पहाटे आग लागली. त्यात कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
देवपूर भागात ‘मैत्रेय’चे कार्यालय आहे. या कार्यालयाला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. आगीत कार्यालयातील बहुतांश कागदपत्रे, फर्निचर जळून खाक झाले आहे.आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत कागदपत्रे जळाली असली तरी महत्त्वाची कागदपत्रे वाचली आहे. महत्त्वपूर्ण डाटा यापूर्वीच सेव्ह केल्याचे कंपनीच्या सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान महानगरपालिकेच्या चार अग्निशमनचे बंब घटनास्थळी दाखल होत, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
सभासद व ठेवीदारांनी गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याने कंपनी आधीच चर्चेत होती. ही आगीची घटना घडल्याने वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला आहे. आग लागली नाही तर लावण्यात आल्याचे मत व्यक्त होत आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान ‘मैत्रेय’च्या कार्यालयाला आग लागल्याचे समजताच सकाळी बघ्यांनी त्या परिसरात गर्दी केली होती. त्यात काही कंपनीच्या ठेवीदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे दिसून आले.