Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeकोंकणठाणेसिग्नल शाळेचा प्रयोग अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीस म्हणून केंद्रशासनाकडून जाहीर

सिग्नल शाळेचा प्रयोग अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीस म्हणून केंद्रशासनाकडून जाहीर

आयुक्‍तांकडून शिक्षण विभाग व समर्थ भारत व्‍यासपीठाचे कौतुक

ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या सिग्नल शाळा प्रकल्पाची पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे. देशातील ३५ राज्यातील एक हजार प्रयोगांच्या मधून निवडण्यात आलेल्या २०० प्रकल्पांमध्ये सिग्नल शाळेचा प्रकल्प निवडण्यात आला आहे.

ठाण्यातील विविध सिग्नलवर व्यवसाय करणारी अथवा भिक्षेकरी असलेली मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावी म्हणून ठाणे महानगरपालिकेने ३ वर्षांपूर्वी समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या सहकार्याने देशातील पहिली सिग्नल शाळा तीन हात नाका सिग्नल पुलाखाली सुरु केली. शाळेच्या ३ वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात २ मुले दहावी उत्तीर्ण झाली. जवळपास ४२ मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सिग्नल शाळेचा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प राबविण्यात यावा याबाबत विधानसभेत घोषित केले होते. प्रमाणभूत भाषेच्या अडचणी, कुपोषण, अंधश्रद्धा, भटकी जीवनशैली, बालकामगार, आर्थिक अस्थिरता, सामाजिक व सांस्कृतिक अनुशेष या अडचणींवर मात करत गेल्या ३ वर्षात सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्य धारेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांइतपत शैक्षणिक गुणवत्ता धारण केली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसोबतच पालकांमधील व्यवसनाधिनता, कुटुंबनियोजनाचा अभाव, कौटुंबिक स्थिरता, आदी प्रश्नांवर देखील सिग्नल शाळेच्या माध्यमातून यशस्वी उत्तर शोधले गेले. गेल्या ३ वर्षात विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सिग्नल शाळेच्या प्रयोगाला उचलून धरले. केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयासाठी इंडियन सोशल रिस्पॉन्सिबिलीटी नेटवर्क या संस्थेने देशभरातील ३५ राज्यातील एक हजाराहून उपक्रमांचा अभ्यास करुन निवडक २०० प्रकल्प सर्वोत्तम अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून निवडले. या २०० प्रकल्पांमध्ये सिग्नल शाळेची निवड झाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आता सिग्नल शाळेच्या या प्रकल्पाचा समावेश राष्ट्रीय अहवालात केला जाणार असून सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर या प्रकल्पाच्या प्रचार, प्रसिद्धी व सक्षमीकरणासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करणार आहे.

अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस पुरस्कार प्राप्त झाल्यावर आयुक्त जयस्वाल यांनी शिक्षण विभाग व समर्थ भारत व्यासपीठाच्या चमूचे कौतुक केले असून या निवडीमुळे ठाणे महानगरपालिकेचे नाव राष्ट्रीय स्तरावर गौरविले गेल्याची भावना व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments