Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeकोंकणठाणेराष्ट्रवादीचे नगरसेवक करणार बुलेट ट्रेनला विरोध

राष्ट्रवादीचे नगरसेवक करणार बुलेट ट्रेनला विरोध

आनंद परांजपे यांचा इशारा

ठाणे – ठाणे महापालिकेच्या आरक्षित जमिनीवरून जात असलेल्या बुलेट ट्रेनला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महासभेत विरोध करतील, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मांडली. एकीकडे मध्य रेल्वे रडत-रखडत चालत आहे. त्याकडे खासदारांचे लक्ष नाही. मात्र, बुलेट ट्रेनसाठी पायघड्या टाकल्या जात आहेत, हे राष्ट्रवादी सहन करणार नाही, असेही परांजपे यांनी सांगितले.

आनंद परांजपे यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनसाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील 36.62 हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र ही जागा विकास आराखडयात शाळा, पोलीस ठाणे, प्रभाग समिती कार्यालय, मल: विविध प्रकल्पांसाठी आरक्षित असल्यामुळे आरक्षणांमध्ये फेरबदल करावे लागणार आहेत. या संदर्भात राज्य शासन स्तरावर एक बैठकही झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महापालिकेने जागा आरक्षण फेरबदलांचा प्रस्ताव तयार केला होता आणि तो सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीला आणण्यासाठी महापौरांकडे पाठविला होता. मात्र या प्रकल्पास विरोध असल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव सभेच्या विषयपत्रिकेवर घेतला नव्हता. आता शिवसेनेने 19 जूनच्या सर्वसाधारण सभेपुढे तो  मंजुरीसाठी आणला आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या ट्रेनच्या मार्गासाठी गावांमधील 19.49 हेक्टर तर स्थानकाच्या उभारणीसाठी म्हातार्डी गावातील 17.13 हेक्टर इतके भूसंपादन करावे लागणार आहे. सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला होता. आता बुलेट ट्रेनसाठी पायघड्या टाकण्यात येत आहेत. नव्याने निवडून आलेले खासदार मध्य रेल्वेच्या समस्यांकडे पाठ फिरवत आहेत. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत आहे. ठाण्याचे एक्स्टेंडेट रेल्वेस्थानकाची एक विटही पुढे सरकत नाही;  ठाणे ते दिवा दरम्यान 5 वी तथा सहावी रेल्वे लाईन, दिव्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला  सुटणारी लोकल, कल्याण टर्मिनसच्या समस्या या बाबींकडे आता निवडून आलेल्या खासदारांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, बुलेट ट्रेनला पायघड्या घालून भूमिपुत्रांच्या जमिनीवर नांगर फिरवला जात आहे. भूमिपुत्रांच्या शेतजमिनी संपादीत करुन त्यांना देशोधडीला लावण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध असून आमचे सर्व नगरसेवक महासभेमध्ये या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments