लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।
कवी सुरेश भट यांच्या या कवितेतून प्रत्येक मराठी मनात आपल्या भाषेविषयी असलेली आत्मीयता प्रकट होते. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती नंतर भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी भाषिकांसाठी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या विविध भागात बोलली जाणारी मराठी भाषा हि महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून गोवा राज्याची सह-अधिकृत भाषा आहे. मराठी हि देशातील २२ अधिकृत भाषांपैकी एक असून २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या जवळजवळ ९ कोटी आहे. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी हि भारतात तिसऱ्या तर जगात १० व्य क्रमांकावर येते.
मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो?
मराठीतील थोर कवी, लेखक, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त २७ फेब्रुवारी या दिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यात दिलेले योगदान पाहता त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जन्मदिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचा शासन निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी घेतला. मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार अशी कुसुमाग्रज यांची ओळख असून त्यांनी मराठीमध्ये सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटकं आणि सहा एकांकिका लिहिल्या आहेत.
मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यांमध्ये फरक काय?
मराठी भाषा गौरव दिन’ हा २७ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. परंतु, अनेक जण या दिवशी मराठी राजभाषा दिन समजून शुभेच्छा देतात. मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यामध्ये लोक गोंधळून जात असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते. मराठी राजभाषा दिन हा १ मे रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबद्दल १० एप्रिल १९९७ रोजी परित्रकातून हा दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. तेव्हापासून २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन तर १ मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ‘मराठी भाषा गौरव दिवस’ (२७ फेब्रुवारी) आणि ‘मराठी भाषा दिवस’ (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.
Web Title: What is the difference between ‘Marathi Bhasha Gaurav Din’ and ‘Marathi Rajbhasha Din’?