रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्य़ातील जातिवंत हापूस आंब्याला राज्यात सर्वदूर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने खास वाहतूक योजना तयार केली आहे. यामुळेे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाचे व्यवस्थापन उत्पन्नाचे नवनवीन स्रोत शोधत आहे. त्या दृष्टीने किराणा माल, इमारती बांधकामासाठी आवश्यक साहित्य, औद्योगिक माल आदी विविध प्रकारच्या मालाची वाहतूक एसटीने सुरू केली आहे. याच धर्तीवर यंदाच्या हंगामात रत्नागिरी विभागातून आंबा वाहतूक करण्याचे नियोजन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने केले आहे.
आंबा बागायतदार आणि खरेदीदार या दोघांनाही फायदेशीर असलेल्या या योजनेअंतर्गत थेट बागेतून किंवा गोदामातून आंब्याच्या पेटय़ा उचलणे, एसटीने निश्चित केलेल्या ठिकाणी बागायतदारांनी पेटय़ा आणून देणे, एकाच व्यापाऱ्याकडे सर्व माल उतरवणे, शहरातील विविध भागात ट्रक जाऊ शकेल अशा ठिकाणी नगावर माल उतरवणे, असे सर्व पर्याय एसटीने खुले ठेवले आहेत.
या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, राज्यातील एखाद्या शहरातून एसटीकडे आंब्याची मागणी केली गेली तर त्या ग्राहकाला थेट बागायतदाराशी जोडून देण्याचे कामही एसटी महामंडळ प्रशासन करणार आहे. या नियोजनामुळे रत्नागिरी जिल्ह्य़ातील आंबा बागायतदारांना संपूर्ण राज्याची बाजारपेठ खुली होणार आहे.त्याचबरोबर, राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेला कोकणच्या बागेतील आंबा उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील मोठय़ा बागायतदारांसह छोटय़ा बागायतदारांनाही किफायतशीर दरात, राज्यात कुठेही आंबा वाहतुकीसाठी आम्ही व्यवस्था करत आहोत.
गेल्या वर्षीच्या हंगामातील अखेरच्या दिवसांत करोनाचा मोठा उद्रेक असतानाही सुमारे ३ हजार ५०० लाकडी खोक्यांची वाहतूक एसटीच्या माध्यमातून केली. मुंबई उपनगरे, पुणे, वाशी मार्केटसह अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्य़ात एसटीने आंबा पोचवण्यात आला.
यंदा जास्त आधीपासून नियोजन आणि करोनाच्या कमी तीव्रतेमुळे मुंबई-पुण्याबरोबर राज्यातील अन्य शहरांमध्ये नवी बाजारपेठ मिळवण्याची संधी आंबा व्यावसायिकांना या योजनेद्वारे उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर, राज्यातील जनतेला थेट बागेतून रास्त दरातील दर्जेदार रत्नागिरी हापूस घरबसल्या मिळणार आहे. अशी माहिती रत्नागिरी विभागीय अधिकारी अनिल म्हेत्तर यांनी दिली.
आंबा हे फळ नाजूक असल्यामुळे त्याच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ५ डझनाच्या लाकडी खोक्यापासून २ डझनाच्या पुठ्ठय़ाच्या खोक्यापर्यंत सर्व पॅकिंगमधील आंबा एसटी स्वीकारणार आहे. पुठ्ठय़ाचा खोका फाटू नये, तळातील आंबा पेटीवर दाब पडू नये, वाहतुकीदरम्यान ट्रकमधील आंबा खोके सरकू नयेत, हवा खेळती राहावी, यासाठी एसटी आपल्या ट्रकमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदलही करणार आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी विभागीय कार्यालयातील १० अधिकाऱ्यांसह ९ आगारातील २० कर्मचारी आंबा बागायतदारांच्या भेटी घेत आहेत.