मुंबईतील पत्रकारांनी शुक्रवारी मंत्रालयातील गांधीजींच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला.
सोमवारी झालेल्या अपघातात जमीन व्यापारी पंढरीनाथ आंबेरकर हे चालवत असलेल्या एसयूव्ही खाली पत्रकार शशिकांत वारीशे (४८) यांची स्कूटर आली होती त्यात वारिसे यांचा दुसऱ्या दिवशी रुग्णालयात मृत्यू झाला.
पंढरीनाथ आंबेरकर या भागातील प्रस्तावित रिफायनरीसाठी भूसंपादनाला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला धमकावत असे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
राजापूर येथील पेट्रोल पंपाजवळ सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी हि घटना घडली. त्याच दिवशी सकाळी पत्रकार वारिशे यांनी आंबेरकर विरुद्ध लिहिलेला लेख एका स्थानिक मराठी वृत्तपत्रात छापून आला होता.
आंदोलक पत्रकारांनी दुपारी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी केली.
या हत्येचा तसेच त्यामागील मोठ्या कटाचा उलगडा विशेष तपास पथकाद्वारे (SIT) करून आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू करण्यात यावा, असे आंदोलनातील सहभागींनी सांगितले.
वारिशे यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही उपस्थित आंदोलकांनी केली.
Web Title: Journalist Varishe Murder Case: Journalists protest at Mantralaya; seek MCOCA against accused