पालघर: जव्हार तालुक्यातील कोरोना संसर्गाचा अचानक भडका उडाला असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व केंद्रीय स्वयंपाक गृहातील कर्मचारी वर्गाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे. आतापर्यंत एकूण ७२ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील हिरडपाडा शासकीय आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थी, तीन शिक्षक व आदिवासी विकास विभागाचे विनवळ येथील सरकारी केंद्रीय स्वयंपाक गृहात काम करत असलेले १६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. याचबरोबर जव्हार नगर परिषद हद्दीतही नऊ रुग्ण आढळून आले. गेल्या दोन चार दिवसात हे रुग्ण आढळले आहेत.
मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने जव्हार तालुका पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. या रुग्णांना किरकोळ लक्षणे असून यातील काही रूग्णांना विक्रमगड येथील रिव्हेरा करोना उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे.
तालुक्यातील हिरडपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता दहावी ते बारावी वर्गात शिकत असलेल्या नऊ विद्यार्थ्यांना एकाच वेळी ताप, सर्दी, खोकला येत असल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यांची प्रतिजन तपासणी केली असता सर्वांना बाधा झाल्याचे आढळून आले.
तातडीने आश्रमशाळेतील विद्यार्थी व हिरडपाडा गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक व कर्मचारी असे ४० रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू आहे.