Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्रालयातील ‘उंदीर’ अडचणीत,’त्या’ संस्थेची चिरफाड!

मंत्रालयातील ‘उंदीर’ अडचणीत,’त्या’ संस्थेची चिरफाड!

Rat-Mantralaya-Chandrakant Patilमहत्वाचे…
१. ‘त्या’ संस्थेचे अस्तित्व तपासा; सहकार खात्याला पत्र
२. कंत्राटामध्ये एक कंत्राट हे विनायक सहकार मजूर संस्थेच्या नावे
३. ज्याच्या नावावर संस्था आहे तोच जिवंत नसतांना सह्या कुणी मारल्या


मुंबई : उंदीर मारण्याच्या विषयावरून राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारच्या बांधकाम विभागाने आता ज्या संस्थेला उंदीर मारण्याचे काम दिलेले आहे, त्या संस्थेचे अस्तित्व काय आहे? याची माहिती घेण्यासाठी सहकार खात्याला पत्र दिल्याची माहिती बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उंदीर बॉम्बने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. उंदीर प्रकरणात झालेली कोंडी सोडवण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. उंदीर प्रकरणात राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन केले. यावेळी हे काम उंदीर मारण्याचे काम नसून उंदीर निर्मूलनासाठी केलेल्या उयाययोजनेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उंदीर निर्मूलनाचे काम ज्या मजूर संस्थेला दिले होते. त्या संस्थेला दिलेले पैसे हे मुंबई जिल्हा बॅंकेतील त्यांच्या चालू खात्यात जमा केल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. तसेच बांधकाम विभागाने ज्या संस्थेला उंदीर मारण्याचे काम दिलेले आहे, त्या संस्थेचे अस्तित्व काय आहे? याची माहिती घेण्यासाठी सहकार खात्याला पत्र दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.दरम्यान,ज्या कंपनीला उंदीर मारण्याचे कंत्राट दिले होते, ती कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्त्वात नसल्याचे समोर आले आहे.ही संस्था केवळ कागदोपत्री आहे. उंदीर मारण्याच्या कंत्राटामध्ये एक कंत्राट हे विनायक सहकार मजूर संस्थेच्या नावे आहे. या संस्थेने १७ हजार उंदीर मारल्याचा दावा आहे. पण, ज्यांनी ही संस्था सुरू केली. त्यांनाच ही संस्था कोण चालवते हे माहिती नाही. अमोल शेडगे यांच्या नावावर ही संस्था स्थापन केली. मात्र, आता अमोल शेडगेच हयात नाहीत, असे असताना त्यांच्या खोट्या सह्या करून ही संस्था कार्यरत आहे. शेडगे यांनी आपले नातेवाईक वामन देवकर यांच्या सल्ल्याने २००२ रोजी विनायक सहकार मजूर संस्था स्थापन केली. २००४ साली संस्था रद्द झाल्याचे सांगितले असताना ही संस्था अजून कार्यरत असल्याचे समोर आले. यावेळी, त्यांनी संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली असता, उडवा-उडवीची उत्तरे दिली. मग, शेडगे कुटुंबियांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढली असता, मृत असलेला मुलगा अमोलच्या नावाने खोटी सही करून ही संस्था सुरू असल्याचे समोर आले. आता हा उंदीर घोटाळा समोर आल्याने त्याच्यामागे अजूनही खोट्या संस्थांच्या नावे अनेक घोटाळे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

खडसेंचा नेमका आरोप काय?
मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर झाले होते. ते मारण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आले. ६ महिन्यांत सर्व उंदरांचे निर्मूलन करण्याचे ठरले होते. मात्र, ७ दिवसांतच सर्व उंदीर मारल्याचे सांगण्यात आले. दिवसाला ४५ हजार उंदीर मारल्याचे सांगितले. पण, या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवाना नव्हता. मंत्रालयात विष आणण्यास परवानगी नाही. धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणले नव्हते. ते त्यांनी मंत्रालयात असलेले उंदीर मारण्याचे विष घेतले आणि प्राशन केले. हा खूप मोठा घोटाळा आहे. याची चौकशी करा, अशी मागणी खडसेंनी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments