Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकासआघाडीच्या पारड्यात ८० टक्के जागा, १३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष

महाविकासआघाडीच्या पारड्यात ८० टक्के जागा, १३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष

मुंबई : “ग्रामपंचायत निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीतील ८० टक्के जागा महाविकासआघाडीमधील पक्षांना मिळालेल्या आहेत. महाविकासआघाडीवर जनतेने विश्वास दाखवला आहे. आम्ही केलेल्या कामांवर लोकं समाधानी आहेत.” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तसेच, चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला असल्याचेही थोरात यांनी सांगितले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतलेल्या पत्रकारपरिषदेनंतर, काँग्रेसने देखील पत्रकारपरिषद घेत या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाची माहिती दिली.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, “कोल्हापूर, नंदुरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, वाशी, बुलढाणा या १३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष राहिलेला आहे. याशिवाय विदर्भामधील यश लक्षणीय आहे.

५० टक्के जागा काँग्रेसला मिळाला असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. निर्विवाद यश विदर्भात काँग्रेसला मिळाल्याचं दिसून येत आहे. मराठवड्यात देखील अनेक ठिकाणी काँग्रेसला यश मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

अजून अनेक ठिकाणचे निकाल समोर यायचे आहेत. एकूणच १४ हजार ग्रामपंचायतीं पैकी चार ते साडेचार हजार ग्रामपंचायती काँग्रेसला मिळाल्या आहेत.”

तसेच, “राज्यात भाजपाची पिछेहाट या निवडणुकीतून दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष यांची स्वतःची गावं देखील त्यांच्या ताब्यात राहिलेली नाहीत. या ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आलेला नाही. मात्र खोटं बोलण्यात ते पटाईत असल्याने ते माध्यमांवर कदाचित वेगळं काही सांगू शकतात.

पंरतु हे स्पष्टपणे दिसत आहे की या निवडणुकीत भाजपाची मोठी पिछेहाट झालेली आहे. महाविकासआघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे.” असं देखील थोरात यांनी यावेळी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments