skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्र‘मी सैन्यात भरती होण्यास तयार’, आठवलेंना मनसैनिकाचे खुले पत्र

‘मी सैन्यात भरती होण्यास तयार’, आठवलेंना मनसैनिकाचे खुले पत्र

मुंबई: मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण करण्याऐवजी सीमारेषेवर जाऊन लढावे, असा सल्ला देणाऱ्या रामदास आठवले यांना मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी सीमेवर जाण्यास तयार असून मला हल्ला करण्यासाठी लागणारे शस्त्र उपलब्ध करुन द्यावे’ अशी मागणी मनसेचे सचिव इरफान शेख यांनी केली आहे.

एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरोधात खळ खट्याक सुरु केले. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड करत त्यांना हुसकावून लावले होते.

मनसेच्या या आंदोलनावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली होती. गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करुन त्यांना मारहाण करण्याऐवजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सीमारेषेवर जाऊन पाकिस्तानच्या सैनिकांना मारावे, असे आठवलेंनी म्हटले होते. फेरीवाल्यांनी कुठे बसावे आणि कुठे नाही हे मनसेचे कार्यकर्ते ठरवू शकत नाही. फेरीवाल्यांना मारहाण करण्याच्या अधिकार मनसेला नाही, असे त्यांनी सुनावले होते.

रामदास आठवले यांच्या टीकेला मनसेचे सचिव इरफान शेख यांनी प्रत्युत्तर दिले. इरफान शेख यांनी आठवलेंना खुले पत्र लिहीले आहे. तुम्ही दिलेले आव्हान मी स्वीकारण्यास तयार आहे. मला आपण केंद्रीय मंत्री म्हणून सीमेवर जाण्याची परवानगी द्यावी व हल्ला करण्यासाठी लागणारे शस्त्र उपलब्ध करून द्यावे, आपण स्वतः सीमेवर मला भारतीय जवानांसोबत सोडण्यास यावे, असे इरफान शेख यांनी पत्रात म्हटले आहे. ज्या देशात राहता, त्या देशाच्या रक्षणासाठी लढा ही शिकवण मला माझ्या धर्माने दिली आहे, त्यामुळे मी हे आव्हान स्वीकारतो असे त्यांनी नमूद केले.

काही दिवसांपूर्वी रामदास आठवलेंनी सैन्यात भरती झाल्यावर रम पिता येते, म्हणून तरुणाने सैन्यात भरती व्हावे असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा दाखला इरफान शेख यांनी आठवलेंना चिमटा काढला. मी सीमेवर कोणतेही मद्य घेणार नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments