बीड – अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विभागाच्या प्रसुती विभागात रविवारी २९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता एका महिलेने दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला. प्रसुतीशास्त्र विभागातील प्रख्यात सर्जन तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड शस्त्रक्रिया पूर्ण केली. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत.
या बाबतची अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात परळी तालुक्यातील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. तिच्यावर उपचार करताना व तिची पूर्वीची कागदपत्रे तपासताना तिच्या पोटातील बाळ असामान्य असल्याचे लक्षात आल्यावर सर्व दक्षता घेत डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलेला शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन टेबलवर घेतले. महिलेचे सीझर करून बाळाला बाहेर काढले असता बाळाला दोन तोंड असल्याचे लक्षात आले. सदरील बाळाचे वजन ३ किलो ७०० ग्रॅम असून बाळ आणि बाळाच्या आईची प्रकृती सध्या चांगली आहे. बाळाच्या संपुर्ण हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यावर शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या बाळाला दोन डोके, दोन मुत्राशय आणि दोन फुफ्फूस असले तरी इतर सर्व अवयव एकच आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयात यापुर्वी २०१४ साली एका महिलेने सातव्या महिन्यात अशाच एका बाळाला जन्म दिला होता. मात्र, ते बाळ लगेच मृत पावले होते. अशा बाळाच्या आयुष्याबद्दल खात्रीशीर काहीही सांगता येत नसले तरी अशी बाळे अनेक वर्षे जगत असल्याचीही अनेक उदाहरणे वैद्यकीय शास्त्र अभ्यासात आढळून आली असल्याचेही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले. सदरील बाळाच्या आईला यापुर्वी तीन मुली आणि एक मुलगा असून हे पाचवे आपत्य असून बाळाच्या आईची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
डॉ. संजय बनसोडे हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करू लागल्यानंतर अनेक अवघड शस्त्रक्रिया करून त्यांनी अनेक महिलांचे व बाळांचे प्राण वाचवले आहेत. एवढेच नव्हे तर अवघड शस्त्रक्रियांचे देशपातळीवर विक्रम केले असून वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि प्रसुती विभागाचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर स्पष्टपणे उमटवले आहे. डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या अलौकिक कार्याचे कौतुक अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, प्रसुतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. शैलैष वैद्य यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी केले आहे.