Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रजेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पुतळा अनावरणावरुन राडा;पडळकरांकडून शरद पवारांवर घणाघाती टीका

जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पुतळा अनावरणावरुन राडा;पडळकरांकडून शरद पवारांवर घणाघाती टीका

गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

gopichand-padalkar-criticize-on-ncp president-sharad-pawar-ahilyabai-holkar
gopichand-padalkar-criticize-on-ncp president-sharad-pawar-ahilyabai-holkar

पुणेः खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार  आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र आज पहाटे अचानक भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर  हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचा-यांमध्ये झटापट देखील झाली.

गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा काळ असल्यानं त्याचं उद्घाटन रखडलं होतं. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं.

गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांकडून त्या पुतळ्याचं अनावरण

शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम : गोपीचंद पडळकर

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टिमेटम

औंढा नागनाथ येथील अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं अनावरण खरं तर गेल्या वर्षी 16 फेब्रुवारीलाच होणार होतं. मात्र वर्ष उलटूनही या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणासंबंधी एक सविस्तर पत्र लिहिलं होतं. या पत्रात पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम पुढच्या 15 दिवसांमध्ये करण्यात यावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. तसंच पत्राच्या सरतेशेवटी जर अनावरण कार्यक्रम झाला नाही तर समस्त समाज बांधवांच्या हस्ते होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकरांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments