Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशराज्यसभेतच तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा राजीनामा; म्हणाले…

राज्यसभेतच तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा राजीनामा; म्हणाले…

tmc-dinesh-trivedi-announces-resignation
tmc-dinesh-trivedi-announces-resignation

नवी दिल्ली: राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असतानाच नाट्यमय घडामोड घडली असून तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेतच राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची स्तुतीदेखील केली. बंगालमधील हिंसाचार पाहून माझी घुसमट होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

राज्यसभेत बोलताना दिनेश त्रिवेदी यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु असल्याचा उल्लेख केला. “प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. आज माझ्या आयुष्यात ती वेळ आली आहे. मी आज राज्यसभेतून राजीनामा देत आहे. मला राज्यसभेत पाठवल्याबद्दल मी माझ्या पक्षाचा आभारी आहे. पण राज्यात हिंसाचार सुरु असतानाही आपण काही करत नाही यामुळे माझी घुसमट होत आहे,” असं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “जर आपण येथे बसूनही काहीच करु शकत नाही तर मग राजीनमा दिला पाहिजे असं माझं मन सांगत आहे. बंगालच्या लोकांसाठी मी काम करत राहीन”.

“आपण देशासाठी राजकारणात येतो. देश सर्वोच्च आहे. दोन दिवसांपूर्वी माननीय मोदी आणि गुलाम नबी आझाद यांनी देशासाठी भावना व्यक्त केली. करोना संकटातही भारताने चांगली कामगिरी केली. मोदींनी १३० कोटी नागरिकांना श्रेय दिलं, पण नेतृत्व त्यांचं होतं,” असं सांगत दिनेश त्रिवेदी यांनी मोदींचं कौतुक केलं.

पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच तृणमूलच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केल आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांची चिंता वाढलेली असताना दिनेश त्रिवेदी यांच्या राजीनाम्यामुळे त्यात भर पडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments