मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी किर्ती कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज डॉ. मगरेंच्या नियुक्तीचे आदेश कुलपतींनी दिले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय देशमुखांच्या हकालपट्टीनंतर कुलपतींनी ही नियुक्ती केली आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी धीरेन पटेल यांची ऑगस्टमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. धीरेन पटेल हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान महाविद्यालय म्हणजेच व्हीजेटीआयचे संचालक आहेत. आता व्हीजेटीआयची धुरा सांभाळताना त्यांना मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळावी लागत होती. अडीच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचं प्र-कुलगुरूपद रिक्त असल्यामुळं प्रशासनावर जोरदार टीका होत होती. वारंवार डेडलाईन देऊनही निकाल वेळेवर न लावल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ही कारवाई केली. मुंबई विद्यापीठाचा निकाल लावण्यासाठी झालेली दिरंगाई ही गंभीर विषय बनला होता. संजय देशमुख यांची हकालपट्टी केली जाईल, अशी यापूर्वीही चर्चा होती. मात्र अखेर राज्यपालांनी त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.
संजय देशमुख यांना यापूर्वीच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. तेव्हाच त्यांची हकालपट्टी केली जाईल, असा अंदाज लावला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यपाल यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतही या विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर चर्चा झाली होती. मुंबई विद्यापीठाने निकालासाठी तीन ते चार वेळा डेडलाईन दिली होती. मात्र तरीही निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासनाला अपयश आलं. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. विष्णू मगरे
RELATED ARTICLES