महत्वाचे…
१.ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांना उग्र आंदोलन न करण्याचा सल्ला २. यावर्षी एफआरपीत अडीचशे रुपयांची केली वाढ ३.एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखाण्यांवर कारवाई
मुंबई : ऊसदरावरून शेवगाव येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उग्र आंदोलन करू नका, शांततेच्या मार्गाने ऊसदराचा प्रश्न सोडवू, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षीपेक्षा केंद्र सरकारने यावर्षी एफआरपीत अडीचशे रुपयांची वाढ केली आहे. राज्य सरकारचीही भूमिका ठाम आहे. साखर कारखान्यांनी एफआरपी दिलाच पाहिजे. एफआरपी देणे सर्वांना बंधनकारक आहे. जे साखर कारखाने एफआरपीनुसार दर देणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यावर सरकार ठाम आहे.
कोल्हापूरच्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन ऊसदराचा फॉर्म्युला ठरवला आहे. पुण्यामध्येही अशीच बैठक झाली. ऊसाबाबत राज्यबंदी उठवावी अशी मागणी होती, ती मान्य केली आहे. ऊसदराच्या बाबतीत झोनबंदीसुद्धा उठवली आहे. ऊसदरासंदर्भात साखर कारखान्यांना विविध सूचना दिल्या आहेत.
साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत संशय व्यक्त होत होता, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक तयार केले आहे. जिथे संशय आहे, तक्रारी आहेत त्या ठिकाणी नियमित तपासणी सुरू आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्नही चर्चेने सोडवला जाईल. सर्वांना विनंती आहे की, चर्चा करून निर्णय घ्यावा. जाळपोळ करुन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करु नये. टायर फोडून शेतकऱ्यांचे नुकसान करु नका. शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आंदोलनाचा फटका सर्वांनाच बसतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री देशमुख यांनी हे शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांना आवाहन केले आहे.
नोव्हेंबरअखेर ८० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल
दरम्यान, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू आहे. कर्जमाफीच्या निकषात बसणारा २००९ पासूनचा कोणताही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी मिळेल असे वाटत नाही असे वक्तव्य केले आहे. त्यासंदर्भात देशमुख म्हणाले, अजितदादांच्या काळात बँकेकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे कर्जमाफी करण्यात आली. त्या कर्जमाफीला दहा महिने लागले होते. पण आमचे सरकार गतिमान आहे, नवीन तंत्रज्ञान वापरून लवकरात लवकर कर्जमाफीची अंमलबजावणी करणार आहोत. जे होऊ शकत नाही ते करून दाखविण्याचे काम सरकार करील. कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत राज्यातील ५५ हजार शेतकऱ्यांना झाला असून, त्यांच्या खात्यांवर सुमारे ३७० कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच येत्या नोव्हेंबरअखेर ८० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असा दावाही देशमुख यांनी यावेळी केला.