पुणे: महाराज असते तर त्यांनीही लोकांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता. महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जनतेचं हित आणि कल्याण लक्षात ठेवूनच घेण्यात आला होता असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा साजरा केला जात आहे. यावेळी अजित पवार बोलत होते.
‘करोना संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहत आहे. गेल्यावेळी असं कोणतंही संकट नव्हतं. शिवजयंती उत्साहात साजरी करायची असते याबाबत कोणाचंही दुमत नाही. पण सध्या करोना संकट आणि खासकरुन विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोलामध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री, गृहमंत्री मागच्या काळात करोनाच्या वेळी घराघरात फिरलेले आपण पाहिले, पण यावेळी त्यांनाही करोनाची लागण झाली आहे. मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे तसंच आपल्यासोबत इतरांचीही काळजी घ्यावी हेच सांगायचं तात्पर्य आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
“करोनाला रोखण्यासाठी शिवजंयतीसारखे सगळेच उत्सव मर्यादित स्वरुपात साजरे करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. आपण सर्वांना याबद्दल सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज जरी आज महाराज असते तर त्यांनीही लोकांचा, रयतेचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता हेदेखील खरं आहे. महाराजांच्या जीवनातील कोणताही प्रसंग घ्या, महाराजांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा आपण अभ्यास करा…त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हे स्वराज्याचं हित आणि जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेला होता हे लक्षात येईल,” असं अजित पवार यावेळी म्हणाले.
“रयतेच्या जीवाला धोका निर्माण होईल असा कोणताही निर्णय महाराजांनी कदापी घेतलेला नाही. राज्यावर आज करोनाचं संकट आणि जनतेच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन गेल्या वर्षभरात सर्व सण, उत्सव मर्यादित स्वरुपात आपण साजरे केले. राज्यातील जनतेने देखील सर्व निर्णयांना पाठिंबा दिला म्हणून करोनावर नियंत्रण आणू शकलो, त्यामुळे सर्वांचे आभार मानतो,” असं अजित पवारांनी सांगितलं. शिवनेरीसाठी देण्यात येणारा २३ कोटी ५० लाखांचा निधी पोहोचला असल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी दिली. या पैशातून दर्जेदार काम झालं पाहिजे अशी सूचनाही अजित पवार यांनी यावेळी केली.
“हा निधी आणि होणारी कामं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि परिसरातील विकासासाठी आहे याची जाण, भान ठेवून कामं झाली पाहिजेत. काम वेळेत सुरु करुन, वेळेतच पूर्ण झालं आहे. कामाचा दर्जा आणि गुणवत्तेत कमतरता खपवून घेतली जाणार नाही,” असं अजित पवारांनी यावेळी बजावलं.