पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह २१ मार्च रोजी रविवारी टिळक चौक येथे निदर्शने केले होते. मात्र, कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी जमविण्यास प्रतिबंधात्मक आदेश दिले गेले आहेत. या आदेशाचे चंद्रकांत पाटील यांनी उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोरोनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाटील यांच्यासह ५० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमवीरसिंह यांनी एका पत्राद्वारे गंभीर आरोप केले होते. गृहमंत्री यांच्यावर झालेल्या आरोपानंतर भाजपने पुण्यासह राज्यभर आंदोलन करीत देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानुसार, शहर भाजपच्यावतीने रविवारी देशमुखांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी राज्यभरासह टिळक चौकात आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
साथरोगासंबंधीच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, याच पार्श्वभुमीवर बेकायदेशीर जमाव जमविणे, आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, कलम १८८ नुसार पोलिसांच्या सुचना तसेच कलम २६९/७० नुसार साथरोगासंबंधीच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खबरदारी न घेता स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण केला
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे ( विश्रामबाग पोलिस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही खबरदारी न घेता स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण केला. त्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.