Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeविदर्भनागपूरनाना पटोलेनंतर आता भाजप आमदारचे लेटरबॉम्ब!

नाना पटोलेनंतर आता भाजप आमदारचे लेटरबॉम्ब!

नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरणे आणि त्यातून होणारी घुसमट यामुळे नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्याचा भडका विझतो न विझतो तोपर्यंत आता भाजपचे आमदार बंड करण्याच्या पवित्र्यात असल्याची चर्चा आहे. भाजपचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्य सरकावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील नाराजीतून नाना पटोले यांनी खासदार पदाचा व भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनीही वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहापानी पत्र पाठवून जाब विचारला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना या अनुकूल परिस्थितीत आपण इच्छाशक्ती दाखवली नाही तर विदर्भातील जनता आपल्याला व आपल्या पक्षाला माफ करणार नाही, अशी रोखठोक भूमिकाही देशमुख यांनी पत्रात मांडली आहे.

देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी मी २०१३ मध्ये बेमुदत उपोषणाला बसलो असता भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी विदर्भासाठी काढलेल्या युवा एल्गार रॅलीत आपण मला तसेच जनतेला भाजपा सत्तेत आल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीचे आश्वासन दिले होते. त्यावेळी आपण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होता. भाजपाने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिल्यामुळे विदर्भातील जनतेने ४४ भाजपा आमदारांना महाराष्ट्र विधानसभेत पाठविले. आता या पाठिंब्याचे व आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

केंद्रात भाजपाचे संपूर्ण बहुमताचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी आपले उत्तम संबंध आहेत. त्यामुळे आता आपण स्वत:च कृतिशील व्हावे. या दोन्ही नेत्यांकडे विदर्भाचे स्वतंत्र राज्य होण्यासाठी शिष्टाई करावी आणि विदर्भ राज्याचा मंगल कलश घेऊन यावा, असे आवाहनही देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती माझ्या हातात नाही, असे आपण अलीकडेच म्हणालात. मात्र, आपण पुढाकार घेतला तर नक्की यशस्वी व्हाल व विदर्भाचे मुख्यमंत्रीही व्हाल,याची मला खात्री वाटते, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. पूवीर्चे राज्यकर्ते बदलून लोकांनी नव्या राज्यकर्त्यांना संधी दिली. परंतु, आपल्या नेतृत्वातील सरकारने तीन वर्षे प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतरही परिणामकारक बदल लोकजीवनात झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा-सुव्यवस्था अधिक बिघडली आहे. प्रश्नांची, समस्यांची मालिकाच आहे. विदर्भाचे राज्य निर्माण केल्यावरच हे प्रश्न सुटू शकतात, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

गुन्हेगारी व भ्रष्टाचार वाढला
नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या रिपोर्टमध्ये नागपूर हे गुन्हेगारीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लहान मुलांवरील अत्याचार व गुन्हेगारीत नागपूर देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र मागील तीन वर्षांपासून भ्रष्टाचारात आघाडीवर आहे. आपण मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना हे कसे स्वीकारायचे, असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments