Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रभीमा कोरेगावात भाजप आणि संघानेच दंगल घडवली; केजरीवालांचा आरोप!

भीमा कोरेगावात भाजप आणि संघानेच दंगल घडवली; केजरीवालांचा आरोप!

सिंदखेडराजा : दोन समाजांत भांडणे लावून राजकारण करण्याची भाजपमध्ये पद्धत आहे. भाजपाचा इतिहास दंगलीचा आहे. भीमा कोरेगाव येथे देखील भाजपा आणि आरएसएसने दंगल घडवून आणली, असा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. सिंदखेडराजा येथे आपच्या महाराष्ट्र संकल्पसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगूल फुंकले.

भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसवर जोरदार टीका करताना केजरीवाल म्हणाले, फोडा आणि राज्य करा अशी नीती वापरत इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली. भारतातील शांतता भंग करण्याचे पाकिस्ताने ७० वर्षापासूनचे स्वप्न भाजपाने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले आहे.

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हा आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच अशी घोषणा यावेळी ‘आप’कडून करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा दिल्ली सरकारने उचलला आहे. ४० हजार कोटींचे बजेट असताना आप सरकार सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देत आहे. महाराष्ट्रात मात्र ३ लाख कोटींचे बजेट असताना सरकारी शाळा विक्रीला काढल्या असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

शिवाजी महाराजांचे नाव घेत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. भाजपा सरकारला शेतकऱ्यांची चिंता नसल्याचे सांगत. दिल्ली सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची माहिती केजरीवालांनी यावेळी दिली. दिल्लीत सत्तेत येऊन तीन महिने झाले होते. पावसाने संपूर्ण पीक मातीमोल झालेले असताना दिल्ली सरकारने परिस्थितीची पाहणी करून अवघ्या तीन महिन्यांत हेक्टरी ५० हजारांची मदत केली. स्वतंत्र भारतात ही सर्वांत जास्त मदत असल्याचे केजरीवाल म्हणाले. देशभरात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची गरज असल्याचे सांगत त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्ली सरकारने आरोग्य, वीज या क्षेत्रात केलेले काम सांगत महाराष्ट्रात देखील आम आदमीच सरकार आलं पाहिजे असे केजरीवाल म्हणाले. सत्तेत आल्यावर दिल्लीत देशभरात सर्वात महाग वीज होती. वीज कंपनीच ऑडिट करून आता देशात सर्वात स्वस्त वीज दिल्ली सरकार देत आहे. महाराष्ट्रात ही ते होऊ शकतं. मात्र, वीज कंपन्या आणि सरकारचे साटलोटे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीजबिलाचा शॉक दिला जात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला की सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेणेही आवाक्या बाहेर जाते. त्यामुळे दिल्ली सरकारने मोफत उपचार पुरवले. हा सगळा प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो. त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणी काँग्रेसला सत्तेबाहेर काढायला हवे असे केजरीवाल उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments