Thursday, September 12, 2024
Homeमहाराष्ट्रबेस्ट डेपोत अभिनेत्री माधवी जुवेकरच्या डान्सवर नोटांची उधळण

बेस्ट डेपोत अभिनेत्री माधवी जुवेकरच्या डान्सवर नोटांची उधळण

मुंबई : ‘बेस्ट’ची कर्मचारी असलेली प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री माधवी जुवेकरच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. वडाळा डेपोत माधवी तोंडात नोटा घेऊन नाचत असताना इतर कर्मचारी तिच्यावर नोटा उधळत असल्याचं दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री माधवी जुवेकर तोंडात नोटा घेऊन नाचताना दिसत आहे. तर बेस्टचे काही कर्मचारी हे माधवी आणि इतर महिला कर्मचाऱ्यांवर नोटा उधळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला.

दसऱ्याच्या निमित्ताने वडाळा डेपो मध्ये कसा धिंगाणा घातला गेला, अशी टीका या व्हिडिओवरुन केली जात आहे. एकीकडे बेस्टची आर्थिक परिस्थिती बेताची असताना दुसरीकडे अशा प्रकारे नोटा उधळल्याने सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, उधळलेल्या नोटा ह्या खोट्या असल्याचा दावा अभिनेत्री माधवी जुवेकरने केला आहे. लहान मुलांच्या खेळण्यातील म्हणजेच चिल्ड्रन बँकेच्या नोटा असल्याचं माधवीने म्हटलं आहे. दसऱ्याच्या निमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रम वडाळा डेपोत सादर झाले. यावेळी देशभरातील विविध नृत्यशैली अशी संकल्पना घेण्यात आली होती. त्यावेळी गरबा, जोगवा असे विविध नृत्यप्रकार कर्मचाऱ्यांनी सादर केले. कच्छी नृत्य करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. या नृत्यात महिला तोंडात पैसे धरुन कमान करतात, त्याप्रमाणे आपण खोट्या नोटा तोंडात धरुन डान्स केल्याचा दावा तिने केला.

बेस्ट कर्मचारी अत्यंत साधे आणि सोशिक आहेत. हा केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा भाग होता. नोटा खऱ्या असत्या तर २९ सप्टेंबरचा व्हिडिओ व्हायरल व्हायला इतका वेळ लागला नसता. कोणीतरी जाणूनबुजून बाकीची नृत्य वगळून केवळ आक्षेपार्ह वाटणारा भाग व्हायरल केल्याचा दावाही माधवीने केला. माधवी जुवेकरची भूमिका असलेल्या फू बाई फू, गंध फुलांचा गेला सांगून, आपण यांना हसलात का? यासारख्या मालिका, तर बालक पालक, कांकण, गोष्ट छोटी डोंगराएवढी यासारखे चित्रपट गाजले आहेत. दरम्यान, बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी सुरक्षा विभागाला या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. यात जो काही धांगडधिंगा घातला गेला आहे, त्या प्रकाराची संपूर्ण चौकशी होईल, असं आश्वासन कोकिळ यांनी दिलं. चौकशीनंतर सादर झालेल्या अहवालानुसार संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments