मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील गृहमंत्र्यांची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. या सर्व घडामोडींमुळे महाविकासआघाडी सरकारसमोर निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकासआघाडी सरकारचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, मात्र त्यांनी ठोस पुरावा दिला नाही. हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण यामध्ये यश येणर नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन आल्यावर हे पत्र समोर आलं आहे व बदली झाल्यानंतरच परमबीर सिंग यांनी हे आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी व योग्य तो निर्णय़ घ्यावा. १०० कोटी कुणाकडे गेले, याचा उल्लेख त्या पत्रात नाही.