मुंबई: अन्वय नाइक आत्महत्या प्रकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारनेच दाबल्याचा थेट आरोप नाइक कुटुंबियांनी गुरुवारी केला आहे. अन्वय नाइक यांच्या पत्नी आणि मुलीने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.
फडणवीस आणि विरोधी पक्षाकडून ज्या प्रकारे सभागृहात महाराष्ट्रातील आत्महत्या प्रकरणे उचलली जातात तसेच अन्वय नाइक आत्महत्या प्रकरण का उचलून धरले जात नाही. आम्ही सुद्धा महाराष्ट्राचेच आहोत. आमचा देखील सीडीआर काढा असे आव्हान नाइक कुटुंबियांनी यावेळी बोलताना दिले आहे.
आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत- नाइक कुटुंबीय
अन्वय नाइक आत्महत्या प्रकरण बाहेर आले तेव्हापासूनच आम्हाला धमक्या मिळत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मला व्यवसाय करू देणार नाही अशा धमक्या मिळत होत्या. आता मात्र जीवे मारण्याच्याही धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत असा दावा अन्वय नाइक यांच्या मुलीने केला आहे.
नाइक यांचे आत्महत्या प्रकरण फडणवीस सरकारनेच दाबले आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची भेटही घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, सरकारकडून दाद मिळाली नाही. आता या सरकारने ते प्रकरण बाहेर काढले. असे नाइक कुटुंबीय म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षाने मनसुख हिरेन प्रकरणावर पत्नीचा जबाब वाचून दाखवला. पुण्यातील युवतीच्या आत्महत्येचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. फडणवीस यांनी सीडीआर सुद्धा काढल्याचा दावा केला आहे. मग, आमचा मुद्दा का उपस्थित करण्यात आला नाही. आम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या महिला आहोत. महाराष्ट्राच्या महिला इतक्या हिमतीने लढत आहेत याचा तर त्यांना अभिमान वाटायला हवा. त्यांनी आमचा सीडीआर का काढला नाही? असा सवाल नाइक यांच्या मुलीने केला.
फडणवीसांचा याच प्रकरणी गृहमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव
अन्वय नाइक आत्महत्या प्रकरणात सभागृहाला खोटे आरोप करून सभागृहाची दिशाभूल केली. तसेच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात झालेल्या निरीक्षणावर सुद्धा दुर्लक्ष केले. सुप्रीम कोर्टाने अन्वय नाइक यांना आत्महत्येसाठी कुणी प्रवृत्त केल्याचे दिसून आले नाही असे म्हटले आहे. तरीही सभागृहात तेच ते आरोप करून, माझ्या बोलण्यावर बंधन आणून गृहमंत्र्यांनी माझा हक्कभंग केला असे आरोप फडणवीस यांनी केले.