मुंबई – फडणवीस सरकारला तीन वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय. त्याची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यांना कर्जमाफी द्या व कर्जमाफीची घोषणा करून तोंडाला पाने पुसू नका, असे ओरडून सांगणे यास मुख्यमंत्री विकासाला खीळ घालणे असे समजत असतील तर सरकारच्या डोक्यात ‘खिळा’ ठोकावाच लागेल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. विकासाला खीळ घालण्याइतके ‘बालिश’ राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. ज्यांनी ते केले त्यांच्या कर्माची फळे महाराष्ट्राची जनता भोगत आहे. तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहोत! जमतंय का बघा. नाहीतर सोडून द्या. समझनेवालों को इशारा काफी है! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला तीन वर्षे झाली आहेत हे सरकारने वृत्तपत्रात दिलेल्या लाखो रुपयांच्या जाहिरातींवरून समजले. सरकारला तीन वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मोठय़ा मुलाखती दिल्या आहेत. त्यात सरकारी ध्येयधोरणे, भविष्याचा दृष्टिकोन यावर बोलण्यापेक्षा शिवसेनेवर टीका करून व धमक्या देऊन तिसरा वाढदिवस साजरा करायचा असे ‘सरकार’ म्हणविणा-यांनी ठरवलेच असेल तर आम्ही त्यांना त्या कामीही शुभेच्छाच देत आहोत. वाढदिवसाच्या दिवशी तरी शुभ बोलावे असे हिंदुत्वाचे रीतिरिवाज व संस्कृती आहे व संघ परिवारात पालन-पोषण झालेल्यांनी तरी या संस्कृतीचे भान राखायला हवे, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, अखंडतेवर आणि स्वाभिमानावर तुळशीपत्र ठेवून कुणाला राज्य करायचेच असेल तर तो त्यांचा दोष आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सर्व मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची पुढील आवृत्ती दिसत आहे. राज्यातील जनता सुखी नाही, त्यांच्या मनात राज्यकर्त्यांविषयी अस्थिरता व अस्वस्थता आहे. विकासाचे नाव नाही आणि याचे खापर मुख्यमंत्री फक्त शिवसेनेवर फोडत असतील तर विकासच नाही तर राज्यकर्त्यांच्या मानेवरील खोपडीचेही ‘गांडो थयो छे!’ असे म्हणावे लागेल अशा शेलक्या शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.