Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रवादळ व गारपीटग्रस्तांना अधिवेशनापूर्वी मदत द्या!: विखे पाटील

वादळ व गारपीटग्रस्तांना अधिवेशनापूर्वी मदत द्या!: विखे पाटील

मुंबई:राज्याच्या अनेक भागात वादळ आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याअगोदर भरपाई देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राज्यावर ओढवलेल्या अस्मानी संकटाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात अनेक ठिकाणी वादळ आणि गारपिटीने प्रचंड थैमान घातल्याच्या तक्रारी अनेक जिल्ह्यांमधून आल्या आहेत. तिघांचा बळी गेला असून, कांदा, हरभरा, गहू आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उभी पिके बाधित झाली असून, कापणी केलेल्या पिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येते आहे.

या नुकसानाची तातडीने स्थळपाहणी पंचनामे करण्याची मागणी आम्ही सकाळी केली होती. सरकारने पंचनामे करण्याचे आदेशही दिले आहेत. नुकसान झालेली घरे, शेती, पशूधन आदींचा तातडीने आढावा घेऊन संबंधितांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भरीव मदत देऊन दिलासा मिळवून द्यावा, अशीही मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments