Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकमला मिल आग: फरार युग तुलीची पोलिसांसमोर शरणागती

कमला मिल आग: फरार युग तुलीची पोलिसांसमोर शरणागती

मुंबई – कमला मिल आग प्रकरणी मोजोस बिस्त्रो हॉटेलचा सह संचालक युग तुली सोमवारी रात्री उशिरा एन. एम. जोशी मार्ग पोलिसांना शरण गेला. शरणागती पत्करलेल्या युग तुलीला पोलिसांनी अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले जाईल. २९ डिसेंबरला घडलेल्या या अग्नितांडवात १४ जणांचा मृत्यू झाला होता.

युग तुली याने या अगोदर मुंबई सत्र न्यायालयात आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली होती. युग तुली स्वतःहून पोलिसांना शरण गेल्याने कमला मिल प्रकरणातील सर्व आरोपींना आता अटक झाली आहे. आज दुपारी ३ वाजता युग तुली याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यापूर्वी वन अबव्ह पबचे तीन मालक क्रिपेश सिंघवी, जिगर सिंघवी, अभिजित मानकर यांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यापसून युग तुली हा फरार होता. त्यालाही आज सकाळी पोलिसांनी अटक केली.काही दिवसांपूर्वी युग तुली हैदराबाद येथील विमानतळावर दिसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर आज पोलिसांनी त्याला अटक केली.

कोण आहे युग तुली ?
युग तुली हा मूळ नागपुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक रविंद्रसिंग तुली यांचा मुलगा आहे. तुली ग्रुपचा संचालक असलेला युग तुली नागपूरसह विदर्भातील अनेक मोठे हॉटेल्स आणि पेट्रोल पंपाचा मालक आहे. त्याने पहिल्यांदा नागपुरातील पॉश अशा बजाजनगर परिसरात मोजोस कॅफे सुरू केले होते. पण, हुक्का पार्लर चालवत असल्याने परिसरातील लोकांच्या तक्रारीमुळे ते कॅफे बंद करावे लागले. त्यानंतर युग तुली हा हॉटेल व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आला. तिथे कमला मिल परिसरात त्याने मोजोस बिस्त्रो कॅफे सुरू केले.
युग तुलीच्या परिवाराची हॉस्पिटॅलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिक्षण क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आहे. युग तुली हा तुली ग्रुपचे संस्थापक मोहब्बतसिंग तुली यांचा नातू आहे. माजी मिस वर्ल्ड युक्ता मुखीचा पती असलेल्या प्रिन्स तुलीचा, युग हा पुतण्या आहे. तुली परिवाराचे नागपुरात तुली इंटरनॅशनल आणि तुली एअरपोर्ट असे दोन मोठे हॉटेल्स आहेत. युग तुली हासुद्धा मुंबईत येण्यापूर्वी नागपुरातील या हॉटेल्सचा कारभार सांभाळायचा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments