मुंबई,मुंबई विद्यापीठाकडून तारीख पे तारीख हा उद्योग सुरू आहे. ऑनलाईन निकाल लावण्याच्या नादात अकरा हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत. जगभर ख्यातनाम असलेल्या मुंबई विद्यापीठाचे वाटोळेही झाले.या सर्व पार्शवभूमीवर काल कुलगुरू संजय देशमुख यांची ज्याप्रमाणे हकालपट्टी केली, तशीच या खात्याचा पदभार सांभाळणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही राज्यपालांनी बडतर्फ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केली.
मुंबई विद्यापीठात काय घोळ आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यातच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पद्धतीने मुंबई विद्यापीठाची दशा पाहता, शिक्षण खात्याचा कारभार न सांभाळू शकणाऱ्या तावडे यांना पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
शिवरायांच्या नावे शेतकऱ्यांची फसवणूक….
ज्याप्रमाणे मुंबई विद्यापीठासंदर्भात तारीख पे तारीख चा खेळखंडोबा झाला, तसेच आता शेतकरी कर्जमाफीबाबतही सुरू आहे. कर्जमाफीची घोषणा अंगलट आल्यानंतर सरकारने दिवाळीच्या तोंडावर घाईघाईत प्रमाणपत्रे वाटली. पण काही दिवसातच सरकारचे पितळ उघडे पडले आहे. डिजीटल कारभार म्हणजे निव्वळ बोगसपणा असून ही कर्जमाफी नियोजनशून्य आहे. सरकारमध्ये अजूनही कर्जमाफी देण्याची कुवत नाही. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून सरकारने शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूकच केल्याची टीकाही मलिक यांनी केली.
… अन्यथा तीव्र आंदोलन
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर गायब झाले आहेत. सरकार त्यांना काहीही बोलू देत नसल्यामुळे त्यांना कृषी क्षेत्रातील काही समजत नाही का, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. या संदर्भात सर्व निर्णय सहकार मंत्री सुभाष देशमुखच घेत आहेत.खुद्द देशमुख हे बोगस संस्थाचालक आहेत.मात्र मुख्यमंत्री मंत्र्यांमध्ये भांडण लावण्यात व्यस्त आहेत. त्यापेक्षा मुख्यमंत्रांनी राज्याकडे लक्ष द्यावे आणि ३४-३६ हजार कोटींचा निधी सरकारने लवकरात लवकर जिल्हा बँकांना द्यावा. यासाठी आम्ही आठ ते दहा दिवसांची मुदत सरकारला देत आहोत.अन्यथा राज्यभरात सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
वळसे पाटील यांचा गौरव….
येत्या ३० ऑक्टोबरला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या एकसष्ठीनिमित्त २७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे गौरव सोहळा आणि गौरव ग्रंथ प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहितीही मलिक यांनी दिली.
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आज रेल्वे महाव्यस्थापकांकडे…
ऐन दिवाळीत नालासोपारा, विक्रोळी, कुर्ला, मुंबई साएसटी या ठिकाणी महिलांवर हल्ले झाले.यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.याच संदर्भात आज आम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेतली असून उद्या संध्याकाळी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावेळी दिली. प्रदेश प्रवक्ते क्लाइड क्रास्टो, संजय तटकरे आदी यावेळी उपस्थित होते.