Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईची पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडली जाणार

मुंबईची पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडली जाणार

मुंबई,मुंबईतील मेट्रो जाळ्याच्या विस्तारीकरणाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो मार्ग क्र. 6 च्या सविस्तर प्रकल्प अहवालास व त्याच्या अंमलबजावणीस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या 14.47 कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एस.व्ही.रोड, एल.बी.एस. तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग एकमेकांना जोडण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऑगस्ट 2015 मध्ये झालेल्या तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या बैठकीत मुंबई मेट्रो मार्गाच्या उभारणी अंतर्गत 118 कि.मी. लांबीच्या उन्नत मेट्रो मार्गाची तातडीने अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली आहे. प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आलेल्या मंजुरीनुसार स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्गापासून जोगेश्वरी-विक्रोळी मार्गाद्वारे कांजूर मार्ग पूर्व द्रुतगती मार्गापर्यंत होता. परंतु, पश्चिम उपनगरातील स्वामी समर्थ नगर क्षेत्रातून जाणारा हा मेट्रो मार्ग, मेट्रो मार्ग- 2 अ ला जोडून संपूर्ण पूर्व-पश्चिम मार्गांची जोडणी तयार करण्याच्या उद्देशाने हा मेट्रो मार्ग स्वामी समर्थ नगर पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने बृहत् आराखड्यातील मेट्रो मार्ग-6 स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो मार्गाचा सुधारित प्रकल्प अहवाल ऑक्टोबर 2016 मध्ये सादर केला. प्राधिकरणाच्या 19 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या 141 व्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून प्राधिकरणाने शासनाची मान्यता घेण्याची शिफारस केली आहे. मेट्रो मार्ग-2अ दहिसर (पूर्व)-डी.एन.नगर (18.6 कि.मी.) प्रमाणेच मेट्रो मार्ग-6-स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी (14.47 कि.मी.) असे दोन्ही मार्ग मिळून सुमारे 33 कि.मी. लांबीचा मेट्रो प्रकल्प दिल्ली मेट्रो महामंडळामार्फत Deposit work म्हणून राबविण्याचे प्रस्तावित आहे.

या पूर्णत: उन्नत असलेल्या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 14.47 कि.मी. राहणार असून त्यात 13 स्थानके असतील. स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, जोगेश्वरी (प.), जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, श्याम नगर, महाकाली लेणी, सिप्झ गाव, साकी विहार रोड, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (प.) आणि विक्रोळी (पूर्व द्रुतगती मार्ग) अशी ही स्थानके असून कांजुरमार्ग येथे कार डेपो नियोजित आहे. मार्च 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असून प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतरची एकूण किंमत 6 हजार 716 कोटी गृहित धरण्यात आली आहे. त्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सहभाग 3 हजार 195 कोटी आणि राज्य शासनाचा सहभाग 1 हजार 820 कोटी तर 1 हजार 700 कोटींचा निधी कर्ज स्वरुपातील असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 2021 मध्ये प्रतिदिन साडेसहा लाख प्रवासी वाहतुकीची क्षमता निर्माण होईल.  या मार्गावर सुरुवातीचे किमान भाडे 10 रुपये तर कमाल भाडे 30 रुपये असेल.

मेट्रो मार्ग-6 हा उपनगरीय रेल्वेशी जोडला जाणार असल्याने तसेच मेट्रो मार्ग -2अ, 7, 3 आणि मेट्रो मार्ग-4 या मेट्रो मार्गामुळे पश्चिम व पूर्व उपनगरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. स्वामी समर्थ नगर, सिप्झ, एल ॲन्ड टी यासारखी वाणिज्यिक क्षेत्रे आणि आय.आय.टी. सारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेस हा मेट्रो मार्ग फायदेशीर ठरेल. या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एस.व्ही.रोड, एल.बी.एस. तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्यात येणार आहेत. या मार्गामुळे मेट्रो मार्ग-२ अ (दहिसर-डी.एन.नगर), मेट्रो मार्ग-७ (दहिसर-अंधेरी), मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) व मेट्रो मार्ग-४ (वडाळा-ठाणे-कासारवडवली) या मेट्रो मार्गांशी प्रवासी जोडले जाणार आहेत.  सन 2021 पर्यंत 6.50 लाख तर 2031 पर्यंत सुमारे 7.70 लाख प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासाचे फायदे उपलब्ध होतील. तसेच, वेळेची बचत, इंधन बचत, वाहन खर्च आणि प्रवासास लागणाऱ्या वेळेमध्ये बचत होऊन रस्त्यावरील दुर्घटना, ध्वनी व हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments