नाशिक : निफाड न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे बाराशे रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणारा निफाड पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर सुकदेव गांगुर्डे (५७) यास सोमवारी (दि़३०) नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड न्यायालयात ४३ वर्षीय तक्रारदाराविरोधात खटला सुरू आहे़ या खटल्यात न्यायालयाने तक्रारदाराविरोधात अटक वॉरंट काढले आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदारास अटक न करणे तसेच न्यायालयीन खटल्यात मदत करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे यांनी बाराशे रुपयांची मागणी केली होती़ याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली होती़ त्यानुसार सोमवारी निफाडमध्ये सापळा लावण्यात आल्यानंतर निफाड बसस्थानकात तक्रारदाराकडे बाराशे रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताच गांगुर्डे यांना रंगेहाथ पकडण्यात आले़
याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी वा कर्मचारी किंवा त्यांच्यासाठी कोणी खासगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा टोल फ्री क्रमांक १०६५ वर संपर्क करण्याचे आवाहन अधीक्षक पंजाबराव उगले यांनी केले आहे़