नाशिक: भविष्यात काँग्रेसमध्ये बदल झाले आणि राहुल गांधी अध्यक्ष झाले तर हा बदल स्विकारणारा आहे. काँग्रेसचा अध्यक्ष हा देशाचा नेता असतो. कारण काँग्रेस हा मोठा पक्ष आहे अशी स्तुतीसुमनं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उधळलीये.
सत्ताधारी भाजप मधून मधून राष्ट्रवादीशी मैत्री करत असतानाच आता शिवसेनेलाही राहुल गांधी स्तुत्य वाटू लागलेत. आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली. २०१४ साली आपण जे राहुल गांधी पाहत होतो. ते आता नाहीये. त्यांच्या नेतृत्वात खूप बदल झाले आहे. आणि लोकं त्यांना ऐकायला उत्सुक असतात. ३ वर्षांपूर्वी जेव्हा राहुल गांधींचं भाषण टीव्हीवर दिसत होतं तेव्हा लोकं चॅनल बदलत होते. आता लोकं त्यांना ऐकताय हा काँग्रेसमध्ये बदल आहे असंही राऊत म्हणाले.
तसंच त्यांच्यात आणि आमच्यात मतभेद जरी असले तरी काँग्रेस हा दीडशे वर्ष जुना पक्ष आहे. त्यामुळे उद्या राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर काँग्रेसचा नेता हा देशाचा नेता असतो, त्याला मान्यता असते, असंही राऊत म्हणाले. याआधीही संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचं नेतृत्व परिपक्व झालं असं सर्टिफिकेटच दिलं होतं.