मुंबई: आम्ही शिवसेनेतच आहोत आणि शिवसेनेसोबतच राहणार असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे मुंबई महापालिकेतील नगरसेवक दिलीप लांडे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मनसेने पक्षाच्या नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला असून महापालिका किंवा समितीच्या बैठकीत पक्षाध्यक्षांकडून पुढील सुचना मिळेपर्यंत मतदान करु नये, असे व्हीपमध्ये म्हटले आहे.
मुंबई महापालिकेतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. गुरुवारी कुर्ला पूर्व – पश्चिम जोडणाऱ्या भूयारी मार्गांचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या सोहळ्याला मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणारे दिलीप लांडे हेदेखील उपस्थित होते. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना लांडे म्हणाले, आम्ही शिवसेनेत आहोत आणि त्यांच्यासोबत राहणार आहोत. मनसेने जारी केलेला व्हीप आम्हाला मिळालेला नाही, असे त्यांनी सांगितले. मनसेतून फुटलेले सहा पैकी चार नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार अशी चर्चा होती. या चर्चेला लांडे यांनी पूर्णविराम दिला आहे.
मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांविरोधात एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरही लांडे यांनी उत्तर दिले. आमच्यावर आरोप होत आहेत. मात्र, आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. उर्वरित पाचही नगरसेवक माझ्यासोबत आहेत. ते सक्षम असून विभागाच्या विकासासाठी काय निर्णय घ्यावा हे त्यांना समजते, असेही त्यांनी नमूद केले.