आगरा – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ताज महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवले. ताज महालच्या मुद्द्यावरून भारतीय इतिहास आणि संस्कृती संदर्भात वाद सुरू असतानाच योगी आदित्यनाथ यांनी आज ताज महालला भेट दिली.
योगींनी यमुना नदीवर साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून बनवण्यात येणाऱ्या रबड चेक धरणाचे निरीक्षण केले. यानंतर योगींनी ताज महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवले. तसेच योगी शहाजान पार्क आणि मुगल म्यूझियमलाही भेट देणार आहेत.
काही दिवसांपूर्वी ताजमहाल भारतीय संस्कृतीचे प्रतिक नाही, असे विधान योगींनी केले होते. उत्तर प्रदेश टुरिझमच्या बुकलेटमधूनही ताज महाल वगळण्यात आले होते. तसेच, उत्तर प्रदेशातील भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल भारतीय इतिहासावर कलंक असल्याचे विधान केले होते. यामुळे योगी सरकारवर प्रचंड टीका झाली होती. याचेच डॅमेज कंट्रोल म्हणून योगींनी ताज महालला भेट दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते आहे.