Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशदेशाला वाचवण्यासाठी भाजप नेत्यांनो बोला; यशवंत सिन्हांचे खुले पत्र

देशाला वाचवण्यासाठी भाजप नेत्यांनो बोला; यशवंत सिन्हांचे खुले पत्र

Yashwant Sinhaनवी दिल्ली: भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. चार वर्षांतील सरकारच्या योजना, नोटाबंदी आणि त्याची अंमलबजावणी, पोकळ आश्वासने या मुद्यांवरुन केंद्र सरकारला घेरले आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रात ‘Dear Friend Speak Up’ या मथळ्याखाली सिन्हा यांनी खुले पत्र लिहले. त्यांनी खासदारांना पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. पक्षाच्या मूल्यांना, तत्वांना वाचवण्यासाठी लालकृष्ण आडवाणी आणि जोशी यांनी पुढे यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे की, आपण २०१४ मध्ये पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न केले. त्याचे फळ मिळाले. पण जेव्हा आपल्या पक्षाचे काही लोक निवडणुकांच्यावेळी काम करत होते तेव्हा इतर आपल्याच कामात मग्न होते. २०१४ च्या निकालानंतर देशात इतिहास घडणार, बदल होणार असे वाटत होते. मोदी सरकारने आता चार वर्षे पूर्ण केली. सरकारला जे काही काम करायचे होते ते केले पण मतदारांचा विश्वास गमावला आहे. सरकार आपल्या दिलेल्या आश्वासनांना विसरले असल्याचे यशवंत सिन्हा यांनी म्हटले.

यशवंत सिन्हा यांनी लिहलेल्या पत्रातील मुद्दे

अर्थव्यवस्था ढासळली
सरकारकडून जरी अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे सांगितले जात असले तरी ते सत्य नाही. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही. जर तसे असते तर शेतकरी संकटात नसते, बेरोजगारीचे चित्र दिसले नसते. उद्योग धंद्यांचे दिवाळे निघाले आहे. शेअर बाजारात झालेली  घसरण यावरुन अर्थव्यवस्था चांगली आहे कसे म्हणता येईल? आपल्याकडे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करुन परदेशात पळून जातात तरीही सरकार बघत बसते.

महिला असुरक्षित बनल्या
दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आरोपी, गुन्हेगारांना शिक्षा होण्याऐवजी आपलेच लोक गुन्हेगारांचे समर्थन करत आहेत. तर काही ठिकाणी पक्षातील लोकच गुन्हेगार आहेत. पहिल्यापेक्षा महिला आणखी असुरक्षित बनल्या आहेत.

जातीवादावरुन होणारा अन्याय
समाजात अल्पसंख्यांकांना न्याय मिळत नाही. त्यांना स्वत:चे स्थान राहिले नाही. समाजातील अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचार होत आहेत. यापुर्वी अशी परिस्थिती बघायला मिळाली नव्हती. संविधानाने दिलेले अधिकारही काढून घेतले जात आहेत.

पंतप्रधानांचे दौरे आणि अलिंगन…
आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत बोलायचे झाले तर पंतप्रधानांचे परदेश दौरे आणि इतर राष्ट्रांच्या नेत्यांना अलिंगन देण्याने फायदा होत असल्याचे दिसत नाही. आपण आपल्या शेजारच्या देशांसोबत चांगले संबंध राखू शकत नाही. चीनने आपल्या हितसंबांधांना बाधा आणली आहे.

सीमेवर हल्ले वाढले
पाकिस्तानची आगळीक खपवून घेतली जाणार नाही म्हणत आपल्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही तो वाया गेला असे वाटते. सर्जिकलनंतरही पाकिस्तानकडून हल्ले सुरुच आहेत. आपण फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. यापूर्वी इतके हल्ले झाले नव्हते आणि नागरिकांनाही त्रास झाला नव्हता.

पक्षात लोकशाही नष्ट झाली
भाजपमध्ये लोकशाहीला स्थान राहीले नाही. पक्षाच्या बैठकीत खासदार, नेत्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. ते आवाज उठवू शकत नाही. बैठकीत ठराविक लोकच बोलतात बाकी इतरांना फक्त ऐकायचे असते. पंतप्रधानांकडे पक्षातील सदस्यांसाठी वेळ नसतो. पक्षाचे कार्यालय हे एखाद्या कार्पोरेट ऑफीससारखे बनले आहे.

देशातील लोकशाही धोक्यात
गेल्या चार वर्षात देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाहीचे स्तंभ ढासळण्याच्या स्थितीत आणले आहेत. संसदेचा अपमान केला जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज बंद पडल्यानंतर पंतप्रधानांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घ्यायला हवी होती. ती घेतली गेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. लोकशाहीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना. यातून स्पष्ट होते की देशाची न्यायसंस्था किती कमकुवत बनवली आहे. पत्रकार परिषद घेतलेल्या न्यायाधीशांनीही लोकशाही धोक्यात आल्याचे म्हटले होते.

पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?…
संवाद माध्यमांवर नियंत्रण ठेवून निवडणुका जिंकण्याचा पक्षाचा उद्देश असल्यासारखे वाटते. पक्षाच्या अनेक नेत्यांना पुढच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही सांगता येत नाही. यापुर्वीचा अनुभव पाहता पुढच्यावेळी अर्ध्या लोकांना उमेदवारी मिळणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला ३१ टक्के मतदान मिळाले होते तर ६९ टक्के भाजपविरोधात मतदान केले होते. अशा वेळी विरोधीपक्ष एकत्र आला तर पक्ष कुठेच दिसणार नाही.

राष्ट्रहित पाहण्याची गरज
लोकप्रतिनिधींनी राष्ट्राचे हित कशात आहे ते पाहण्याची गरज आहे. पाच दलित खासदारांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली याचा आनंद आहे. आता इतरांनीही आपले प्रश्न, समस्या समोर मांडल्या पाहिजेत. जर असे नाही झाले तर खुप मोठे नुकसान होईल.

या मुद्यांबरोबरच यशवंत सिन्हा यांनी जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांना देशासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ज्या मूल्यांसाठी, तत्वांसाठी आयुष्यभर लढा दिल्या त्याची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी त्यांनी पुढे यायला हवे, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments