महत्वाचे…
१.विमानिर्मिती (एरोस्पेस) क्षेत्राचा शून्य अनुभव असलेल्या रिलायन्सवर सरकारने इतका विश्वास का दाखवला
२‘मेक इन इंडिया’साठी अशाप्रकारचा ‘सेल्फ रिलायन्स’ नक्कीच गरजेचा आहे, असा टोमणा ३. राफेल खरेदी व्यवहारात रिलायन्स कंपनी भागीदार असल्याचा दावा
नवी दिल्ली: भारतीय वायूदलासाठी फ्रान्सकडून विकत घेण्यात येणाऱ्या राफेल जातीच्या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. राफेल खरेदी व्यवहारात रिलायन्स कंपनी भागीदार असल्याचा दावा त्यांनी केलाय. विमानिर्मिती (एरोस्पेस) क्षेत्राचा शून्य अनुभव असलेल्या रिलायन्सवर सरकारने इतका विश्वास का दाखवला, असा सवालही त्यांनी विचारला. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात भाष्य केले. ‘मेक इन इंडिया’साठी अशाप्रकारचा ‘सेल्फ रिलायन्स’ नक्कीच गरजेचा आहे, असा टोमणाही राहुल यांनी मोदी सरकारला लगावला.
काँग्रेसने केलेल्या आरोपांवर राफेल कंपनीने यापूर्वीच स्पष्टीकरण दिले होते. या व्यवहारात भारताचा फायदाच झाला आहे. उच्च कार्यक्षमता आणि योग्य किंमत यामुळेच भारताने ही विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधितांनी कोणतेही आरोप करण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करावी, असे राफेल कंपनीकडून काँग्रेसचे नाव न घेता सांगण्यात आले होते. सर्वप्रथम काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. हा व्यवहार म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मोदी सरकारने एका कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी ५२६ कोटींच्या या व्यवहारासाठी १५७१ कोटी रूपये मोजले, असा आरोप सुरजेवाला यांनी केला होता.