Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशमोदी सरकार हिंदुत्त्व आणि विकासावर अपयशी- प्रवीण तोगडिया

मोदी सरकार हिंदुत्त्व आणि विकासावर अपयशी- प्रवीण तोगडिया

Pravin Togadia, PM Modi

नवी दिल्ली: सध्याची परिस्थिती पाहता मोदी सरकार हिंदुत्त्व आणि विकास या दोन्ही पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. यामुळे तोगडीया आणि मोदी यांचा चांगलाच संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मोदी सरकारने ना धड हिंदुत्त्वाविषयीच्या अपेक्षा पूर्ण केल्या, ना विकासाच्या आश्वासनाची पूर्तता केली. निवडणुका जिंकणे हा केवळ टक्केवारीचा, मतदारयाद्यांचा आणि ईव्हीएम मशिन्सचा खेळ आहे. मात्र, लोकांच्या आश्वासनांची पूर्ती केल्यानंतरच एखादा नेता प्रजाहित दक्ष म्हणवला जातो. त्यामुळे सत्तेच्या नादात वाहवत जाऊ नका. हे म्हणजे कृतींमध्ये आलेल्या जडत्त्वाचे लक्षण आहे, देशनिर्माण नव्हे, असे तोगडिया यांनी सांगितले.

त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही पाठवले आहे. या पत्राद्वारे तोगडिया यांनी मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. यावेळी आपण मोदींना अयोध्येतील राम मंदिर आणि समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीच्या आश्वासनाचे काय झाले, याबाबत विचारणार असल्याचेही तोगडिया यांनी सांगितले.
याशिवाय, तोगडिया यांनी पत्रात मोदींसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. बऱ्याच काळापासून आपल्यामध्ये मनमोकळेपणाने बोलणे झालेले नाही. जसे 1972 ते 2005 या काळात व्हायचे. देश, गुजरात आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात जे प्रश्न उपस्थित झाले. त्यावर आपण दोघांनीही वेळोवेळी एकमेकांसोबत राहून काम केले आहे. आमचे घर आणि कार्यालयात तुमचे येणे, सोबत भोजन, चहापान करणे, मनमोकळेपणाने हसणे यापैकी काहीही तुम्ही विसरला नसाल.मित्रत्व आणि मोठा भाऊ या नात्याने आपली विविध विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हायची. एकमेकांसाठी एकमेकांसोबत उभे राहायचो. जे २००२ नंतर कमी होत गेले. सत्तास्थानी गेल्यानंतर तुम्ही माझ्यापासून आणि मूळ विचारसरणीपासून फारकत घेतली. तरीही आजही माझ्या मनात मित्रत्व आणि संवादाची अपेक्षा कायम आहे, त्यामुळेच हा पत्रप्रपंच केला आहे. राम मंदिर, गोवंश हत्या,  समान नागरी कायदा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करायची असल्याचे तोगडिया यांनी पत्रात नमूद केले आहे. तोगडीया यांच्या या टिकेमुळे मोदी विरुध्द तोगडीया हा सामना चांगलाच रंगणार आहे. संघ तसेच भाजपातील मोदी विरोधकांना मोदींना टार्गेट करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या निवडणूकांचे आयते कोलीत मिळाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments